शहादा : तोरणमाळ ते सिंधीदिगर घाटातील अपघात हा चुकीच्या पद्धतीने रस्ता बनविण्यात आला असल्याने घडला आहे. नियमानुसार रस्त्याला संरक्षक कठडे आवश्यक असताना तेथे कठडेच नाहीत, त्याचप्रमाणे अतितीव्र चढ-उतार असल्याने वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती नाशिक येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी यांनी दिली.
रविवारी दुपारच्या सुमारास तोरणमाळ ते सिंधीदिगर या घाट रस्त्यात क्रुझर गाडीचा अपघात होऊन त्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर सोमवारी या अपघाताची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे उपविभागीय अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक काजी, जमादार के. आर. नागरे, हवालदार गोलवड यांच्या पथकाने आज अपघातस्थळी पाहणी करून तपासणी केली. संपूर्ण दिवसभर या घाट रस्त्यावर पथकाने विविध बाजूंनी पाहणी करत अहवाल तयार केला आहे.
विभागीय अधिकारी वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घाट रस्त्यात अनेक तीव्र चढ-उतार आहेत. नियमानुसार रस्त्याचे काम झाले पाहिजे. त्याचप्रमाणे अवघड वळणांच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे आवश्यक असताना या रस्त्यावर अपघाती अवघड वळणाच्या ठिकाणी कुठलेही संरक्षक कठडे आढळून आलेले नाहीत. अनेक ठिकाणी तीव्र चढ-उतार असल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. परिणामी घाटात ब्रेक दाबल्यानंतर गाडीचे ब्रेक फेल होणे व त्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील कंट्रोल सुटत अपघात होणे, असा प्रकार घडला आहे.
मुळात जानेवारी महिन्यात याच रस्त्यावर असा अपघात झालेला असताना आमच्या पथकाने या रस्त्याची पाहणी व तपासणी केली होती. त्यानंतर रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून संरक्षक कठडे नसल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतरही ठेकेदाराने व संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यालयाने नियमानुसार या रस्त्याची निर्मिती केली नाही तर भविष्यात असे अपघात घडतील, अशी शक्यता वळवी यांनी व्यक्त केली.
पथकाने केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या असून, याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालय यांना देणार असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या अहवालावर गांभीर्याने या विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या रस्त्यावर कायमस्वरूपी प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागांनी महामार्ग सुरक्षा पथकाच्या अभियंत्यांशी चर्चा करून त्यांच्याद्वारे रस्त्याची तपासणी करून प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही वळवी म्हणाले.