शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
नवापूर : तालुक्यातील हळदाणीसह परिसरात २०१९ मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामेही संबंधित विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन वर्षे उलटूनही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने या नुकसानग्रस्तांना गेल्यावर्षीही नुकसान देण्याचे जाहीर केले होते. परंतु, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाढत्या तापमानाचा शेती कामावर परिणाम
हळदाणी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत असून, शेती कामावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या तापमानामुळे शेत मजुरांनी आपल्या दैनंदिन कामाच्या वेळेत बदल केला असून, दुपारी १२ वाजेपर्यंत जास्तीत जास्त काम आटोपण्याकडे मजूरवर्गाचा कल दिसून येत आहे.