शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
3
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
4
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
5
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
6
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
8
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
9
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
10
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
11
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
12
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
13
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
14
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
15
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
16
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
17
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
18
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
19
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
20
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

नवापुरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती; नवापूरहून धुळ्याला जाण्यासाठी लागणार दीड तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST

नवापूर : तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात बॉर्डरलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत १४० किलोमीटरचा धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या ...

नवापूर : तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात बॉर्डरलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत १४० किलोमीटरचा धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. आता या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, नवापूर ते धुळे अंतर साधारण १२० किलोमीटर आहे. सध्याचा महामार्गावरून धुळ्याला जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. परंतु चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने दीड ते पावणेदोन तास लागतील. यामुळे वेळेची व इंधनाची बचत होणार आहे.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरण कामामागे अनेक वर्षांपासून लागलेली अडथळ्य़ांची मालिका आता थांबण्याची चिन्हे आहेत. विविध संकटांवर मात केल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे.

सुरुवातीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस’ या कंपनीला चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते. आर्थिक संकटात सापडल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प होते.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी नवापूर ते अमरावतीपर्यंतचा ४८०.७९ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग १ एप्रिल २०१३ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी देऊन एल अ‍ॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरू होण्यापूर्वीच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने काम सोडून दिले. सत्तापरिवर्तन झाल्यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नवापूर शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. नवापूर ते फागणे १४०.७९, अमरावती ते चिखली १९४ कि.मी. अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार होते. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर असल्याने गुंतवणूकदार तयार करून ८० टक्के भांडवल तयार करण्याचे मोठे आव्हान कंत्राटदार कंपनीपुढे होते. चौपदरीकरणाच्या कामासाठी गुंतवणूकदार मिळत नसल्याने अडचणीत भर पडली होती. त्यामुळे आर्थिकसह विविध कारणांमुळे महामार्गाचे काम रेंगाळले. नवापूर तालुक्यात ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. कसेबसे काही ठिकाणी काम पूर्ण करण्यात आले. जुलै २०१८ ला या मार्गाचे काम ठप्प झाले. दरम्यानच्या काळात जीएसव्ही कंपनीने ६५ टक्के काम केले होते. आर्थिक कारणास्तव पुन्हा ठेकेदार बदलून मुंबई येथील जे.एम. म्हात्रे यांना रखडलेले चौपदरीकरणाचे काम देण्यात आले. आता कामाला चांगली गती मिळाली असली तरी काम वेळेत पूर्ण होते की, पुन्हा विलंब लागेल यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

महामार्गावरील धुळीचे साम्राज्य कधी संपले?

महामार्गावरील नवापूर, रायंगण, सावरट, सोनखांब व कोंडाईबारी घाटात महामार्गाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याची तात्पुरती दुरुस्ती करताना खड्ड्यांमध्ये मातीचा भराव करण्यात आला होता. परंतु या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा मोटरसायकलस्वार व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर कंपनीने लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.

प्रवेशद्वार सर्वाधिक सुंदर व आकर्षक

जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर राजेश म्हात्रे यांनी माहिती दिली. नवापूर शहरातील स्व. हेमलता वळवी यांच्या पुतळ्याजवळ मोठे जंक्शन येणार असून, ते सर्वाधिक सुंदर व आकर्षक बवण्यात येणार आहे. रंगावली नदीवरून देवळफळीपर्यंत नवीन महामार्ग कसा असणार आहे याचे लेआऊट कंपनीने दिले आहे. तर नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ कसा महामार्ग असणार यांचादेखील प्लान दिला आहे.

कोंडाईबारी घाट कटिंगचे काम युद्धपातळीवर

नवापूर ते फागणेपर्यंत १४० किलोमीटर अंतरावरील महामार्ग चौपदरीकरण व कोंडाईबारी घाट कटिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील छोटे-मोठे पूल तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. ज्या ठिकाणी बस पुलावरून ३५ फूट नदीत कोसळली, त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होतो. तेथेदेखील पर्यायी पुलांचे बांधकाम करून लवकरात लवकर वाहुतकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

नवापुरातील ५९ घरांवर चालणार बुलडोजर

नवापूर शहरातील देवळीफळी व इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरांवर काही दिवसात बुलडोजर चालवले जाणार आहे. ५९ घरे विस्थापित करून शहरातदेखील महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही दिवसात सुरू करण्यात येणार असून, सध्या उपजिल्हा रुग्णालयानजीक कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीने लवकरात लवकर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोन वर्षांपासून वाहनधारकांचे हाल

काही भागात राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या कामाला गती मिळत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.

महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले असून, या पुलांवर अनेक अपघात होत असल्याने पुलांच्या कामांनादेखील गती देण्यात आली आहे. कोंडाईबारी घाटातील पूल, रायंगण पूल, रंगावली पूल व वाकीपाडा पूल जीर्ण झाले आहेत. त्यामुळे नवीन कामांनादेखील नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.

१२२ पुलांचे बांधकाम सुरू

नवापूर ते फागणे महामार्गवरील उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल व मुख्य महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तसेच नद्या, नाले, ओढे यांच्यावरील मोऱ्या रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. नवापूर तालुक्यातील वाकीपाडा, रंगावली, रायंगण, गंगापूर, विसरवाडी, पानबारा, कोंडाईबारी येथील मोठे पूल मृत्यूचे सापळे बनले होते. तसेच लहान व मोठे असे एकूण १२२ पूल आहेत. उड्डाणपूल, पाच मोठे बोगदे तर सात लहान बोगदे आणि तीन रेल्वे उड्डाणपुलांची संख्या आहे. या पुलांचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

पुलामुळे शहराचे दोन भाग होणार नाहीत

नवापूर शहरातील नागरिकांची महामार्ग निर्माण करताना शहरातून पूल न घेता केवळ चौपदरीकरण व सर्व्हिस रोड तयार करावा. गुजरात राज्यातील सोनगड शहराचे महामार्गावरील ब्रीजमुळे दोन भाग पडले आहेत, तसे नवापुरात होणार नाही. पिंपळनेर चौफुलीजवळील शेतातून रंगावली नदीवरील पूल देवळफळीपर्यंत राहणार आहे. साधारण २५ स्तंभांचा हा पूल असणार आहे. देवळीफळीत एमआयडीसीकडे जाण्यासाठी एक बोगदा ठेवण्यात आला आहे. हा पूल देवळफळीत संपले, अशी माहिती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली.

आधुनिक टोल प्लाझा

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणानजीक इच्छापूर येथे टोलनाका येणार, तर नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळ आधुनिकीकरणाने सुसज्ज सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुविधांनी टोल प्लाझा येणार आहे. नवापूरकडून येणारे आठ व धुळेकडून येणाऱ्या आठ अशी एकूण १६ वाहनांच्या रांगांचे नियोजन असणार आहे.

फायदे

लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळेत होऊन वेळेची बचत शक्य, अपघातांचे प्रमाण कमी होईल, इंधनाची बचत होऊन आर्थिक फायदा, वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण टळेल.

ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल

कच्च्या आणि पक्क्या मालाची ने-आण जरी या प्रकल्पाच्या निमित्ताने अधिक वेगवान झाली आणि स्थलांतराचा प्रश्न जरी अंशतः मार्गी लागला तरी आज ज्या नागरी सुविधा मोठ्या शहरांमध्ये अगदी सहज मिळतात त्या जर या महामार्गानजीकच्या भागातील लोकांनाही मिळू लागल्या तर आजच्या घडीला ग्रामीण भागातून शहरात होणारे आदिवासीबहुल भागातील स्थलांतरेसुद्धा कमी होतील.

दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांवरील ७० टक्के काम पूर्ण

नवापूर तालुक्यातील नवापूर नवरंग रेल्वे गेट व चिंचपाडा रेल्वे गेटवर होणारी वाहतुकीची कोंडी व तास्‌न तास वाहतुकीचा खोळंबा लवकरच दूर होणार आहे. दोन्ही ठिकाणी अवघ्या काही महिन्यांमध्ये रेल्वे ब्रीजवरील पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, नवापूर व चिंचपाडा रेल्वे गेटजवळील ७० टक्के काम पूर्णत्वास नेले आहे. सध्या महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. जलदगतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ठेकेदाराकडून चांगले काम करून घेत आहे. २०२२ पर्यंत महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल.

- रवींद्र हिंगोले, अभियंते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, धुळे