समितीकडून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती घेतली जाणार आहे. पाच ते सात सप्टेंबरला होणाऱ्या या दाैऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली आहे. समितीकडून महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण या विभागांकडून महिला व बालकांसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. यात विविध योजना, त्यांच्या अटी, शर्ती, पूर्ण झालेली व सुरू असलेली कामे, महिला व बालकल्याणासाठी राबविण्यात येत असलेली आर्थिक तरतूद, प्राप्त झालेला निधी, खर्च झालेला निधी व अखर्चित रक्कम यासह विविध विषयांची माहिती घेतली जाणार आहे. दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अधिकारी वर्गाला विविध सूचना केल्या जात आहेत.
आदिवासी व आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यात दीर्घ काळानंतर आमदारांची समिती भेट देणार असल्याने कुपोषणासह इतर विविध प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. समितीतील आमदारांचे एक पथक धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांची दुरुस्ती व पोषण आहाराच्या नोंदी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दाैऱ्यात कुपोषणासह गर्भवती मातांच्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.