तळोदा : शहरातील वृद्ध दाम्पत्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर ८५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे़ घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीसात तक्रार करण्यात आली आहे़ अज्ञात व्यक्तीने नाशिक येथील एटीएममधून हे पैसे काढल्याची माहिती आहे़प्रमोद फुंदीलाल वाणी व त्यांच्या पत्नी रजनीकांता यांचे तळोदा येथील स्टेट बँकेच्या शाखेत संयुक्त खाते असून आहे़ गेल्या आठवड्यात पैशांची गरज असल्याने त्यांनी १८ एप्रिल रोजी बँकेत ५० हजार रुपयांचा धनादेश टाकला होता़ परंतू त्यांच्या खात्यात केवळ ४७९ रुपये शिल्लक असल्याचे बँकेने सांगितले होते़ यातून कोणीतरी परस्पर पैसे काढल्याचे समजून आल्यानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती़ खातेवापराचे स्टेटमेंट काढल्यावर नाशिक येथील एटीएममधून अज्ञात व्यक्तीने २ एप्रिल रोजी ४० व १० हजार, ३ एप्रिल रोजी २० आणि १५ हजार असे एकूण ८५ हजार रुपये काढल्याचे समोर आले़ मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी तातडीने तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना माहिती दिली़ त्यानुसार पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तळोदा शहरात याआधीही परस्पर पैसे काढल्याचे प्रकार घडले आहेत़ या प्रकरणांचा छडाच लागत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
तळोद्यात बँक खात्यातून ८५ हजार लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:48 IST