लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी ७३ हजार क्विंटल धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजार स्वस्त धान्य दुकानात हे धान्य पोहोचते करून वितरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या ही १ लाख ५ हजार ९२५, दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड १ लाख ३० हजार ९७१, तर दारिद्र्य रेषेवरील रेशनकार्डधारकांची संख्या ही ८१ हजार ७७३ एवढी आहे. यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थींसाठी शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागाला दिवाळीसाठी धान्य वितरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या लाभार्थींना ७३ हजार ८३० क्विंटल गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले आहेत. यात प्रत्येक रेशनकार्डासाठी १ किलो चनाडाळ मोफत देण्यात येणार असून एक किलो साखर शासकीय दरात देण्याच्या सूचना दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार ५७ दुकानदार आहेत. त्यांच्याकडून मालाचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात असून प्रत्येक लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचते करण्याचे नियोजन असल्याची माहिती पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.
७३ हजार क्विंटल धान्य होणार वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:59 IST