शहादा तालुक्यातील 77 मतदान केंद्रांवर 385 कर्मचारी झाले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:55 PM2021-01-15T12:55:03+5:302021-01-15T12:55:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या १६४ जागांसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांना ४१ हजार ४०२ ...

385 staff left for 77 polling stations in Shahada taluka | शहादा तालुक्यातील 77 मतदान केंद्रांवर 385 कर्मचारी झाले रवाना

शहादा तालुक्यातील 77 मतदान केंद्रांवर 385 कर्मचारी झाले रवाना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या १६४ जागांसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांना ४१ हजार ४०२ मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ७७ मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षांसह ३८५ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. गुरुवारी सकाळी या कर्मचा-यांना साहित्याचे वाटप करून रवाना करण्यात आले. 
         शहादा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. याअंंतर्गत माघारीअंती तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून बुधवारी सायंकाळपर्यंत २१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. प्रचार संपल्यानंतर गुरुवारी प्रशासन कामाला लागून निवडणूक कर्मचारी २२ गावांमध्ये रवाना करण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या १६४ जागांसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीअंती ८१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी शहादा तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन आणि साहित्याचे वाटप निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी ९० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात पाच कर्मचारी असून एकूण ४५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापैकी ७७ पथके कार्यरत करण्यात आले आहेत. उर्वरित १३ पथकांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी गुरुवारी दुपारीच मतदान केंद्रांवर पोहोचले होते. दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर सर्व मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांना मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
         गुरुवारी तहसील कार्यालयाच्या आवारातून मतदान कर्मचा-यांसोबतच ३१४ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांनाही रवाना करण्यात आले. तत्पूर्वी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना तहसील कार्यालय आवारातच जेवणही देण्यात आले. 

पोलीसांचा ताफा  

  •  तालुक्यातील काही गावांमध्ये  अटीतटी व चुरस आहे. यातून वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता असल्याने शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी व शहादा पोलीस ठाण्यांतर्गत प्रभारी परीविक्षाविधीन पोलीस अधीक्षक व शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार, सारंखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, शहादा पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ, विक्रांत कचरे,  युवराज पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील.   
  •  शहादा पोलीस ठाण्याचे ८६, गृहरक्षक दलाचे ३४ जवान, म्हसावद पोलीस ठाण्याचे ४१ कर्मचारी व २० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दल व आरसीपी प्लाटून असे एकूण २२० कर्मचारी व गृहरक्षक दलाचे ८४ जवान निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: 385 staff left for 77 polling stations in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.