केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेती उद्योग तसेच पशुपालन व एकूणच शेतीशी संबंधित उद्योग हे देशातील व विदेशातील भांडवलदारांचे शिकार होणार आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना कृषी माल विकण्यास बंधने येणार आहेत. शेतकऱ्यांना तोटा व भांडवलदारांना फायदा होऊन शेतकरी कर्जबाजारी होतील. शेतकऱ्यांकडून शेतजमिनी काढून घेऊन पूर्ण शेती व्यवसायालाच या कायद्यांमुळे धोका निर्माण होणार असून, या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी कृषीविरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत, सीटू ५०% निर्धारित एमपीएस गॅरंटी कायदा करावा, नवीन वीज कायदा, जो कृषी आणि ग्रामीण भागातील अनुदानित विजेचा हक्क शेतकऱ्यांकडून हिरावत आहे, तो रद्द करण्यात यावा, एनसीआर व वायू गुणवत्ता प्रबंधन कायदा, २०२१ रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन दिल्ली येथील सिंघू बाॅर्डरवर केले आहे. या कार्यकर्ता संमेलनासाठी धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे येथून सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, श्रमिक शेतकरी संघटना, धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना इ. संघटनांचे किशोर ढमाले, रामा गावित, विक्रम गावित, करणसिंग कोकणी, मनोहर वळवी, चिंतामण पाडवी, रविदास वळवी, कांतीलाल गावित, देवीदास पाडवी, प्रभाकर गावित, बाल्या गावित हे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. सत्यशोधक शेतकरी सभा राज्य अध्यक्ष रामसिंग गावित यांच्या उपस्थितीत विसरवाडी, ता. नवापूर येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास रणजित गावित, दिलीप गावित, सुनील गावित, बलमा गावित, सोन्या कोकणी, रमेश गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.