लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील ४० वर्षीय तरूणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर नगर पालिका व आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, आरोग्य पथकाने मंगळवारी सर्वे करून ४७० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. सुदैवाने एकामध्येही लक्षणे आढळून आली नाहीत. शिवाय नगरपालिकेनेदेखील त्या परिसरात औषध फवारणी केली. दरम्यान या तरूणाच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्या नातेवाईकांसह १९ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यातील १३ जणांना जिल्हा रूग्णालयात स्वॅबसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.गेल्या ५ जून रोजी हा तरूण आपल्या मयत मातेसह तळोद्यात आला होता. त्याला शनिवारी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर स्वॅबसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. त्यांचा अहवालही सोमवारी पॉझिटीव्ह आला. त्यानंतर आरोग्य, महसूल, नगरपालिका व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. रात्रीच मोठा माळीवाडा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याशिवाय तळोदा शहर सोमवारपासूनच बंद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने मंगळवारपासून मोठा माळीवाडा परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी डॉ.कृष्णा पावरा व डॉ.विशाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दोन आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून, पथकाने तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे.मंगळवारी जवळपास ४७० जणांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने एकामध्येही सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे अशी कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. सतत १४ दिवस आरोग्य यंत्रणा तेथे तळ ठोकून राहणार आहे. नगर पालिकेनेदेखील या परिसरातील सर्व गल्ल्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. दरम्यान पॉझिटीव्ह तरूणांच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्या नातेवाईकांसह १९ जणांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यातील १३ जणांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांना स्वॅबसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.मोठा माळीवाडा परिसरातील मारूती मंदिरापासून कालीकामाता पर्यंतचा भाग सोमवारीच सील करण्यात आला आहे. परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, पालिका मुख्याधिकारी सपना वसावा, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी भिती न बाळगता घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
तळोद्यात १९ जणांना केले क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:38 IST