लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेकडून सर्व ५९५ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी वाटप करण्याचे नियोजन मंगळवारी केले होते़ परंतु अक्कलकुवा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे बँक खाते क्रमांक प्राप्त न झाल्याने निधी वितरणाला ब्रेक लागला आहे़ बुधवारी निधी वाटप होण्याची शक्यता आहे़केंद्र शासनाकडून नंदुरबार जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी दोन टप्प्यात वितरीत होणार आहे़ यातून जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींना खाते क्रमांकासह इतर माहितीचा देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने केले होते़ यात ५९३ ग्रामपंचायतींनी गेल्या आठवड्यातच माहिती भरून दिल्याने सोमवारी निधीचे वितरण होण्याची शक्यता होती़ परंतु दोन गावांच्या पंचायतींनी माहितीच दिलेली नसल्याने अडचणी निर्माण होवून जिल्हा परिषदेला वितरण थांबवावे लागले आहे़ बँकेत एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतींचे खाते अपडेट करण्याची गरज असल्याने ही कारवाई एकाचवेळी करण्याचे उद्दीष्ट्य ग्रामविकास विभागाने ठेवले आहे़ परंतु दोन पंचायती शिल्लक राहिल्या असल्याने कामकाजाला विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील सर्व ५९५ ग्रामपंचायतीना थेट ८० टक्के निधी मिळणार आहे़ यातून त्या-त्या गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे़
याबाबत ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी दोन ग्रामपंचायतींचे बँक खाते डिटेल्स प्राप्त झालेले नाहीत़ तांत्रिक कारणामुळे अडचणी आल्याने आता बुधवारी वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल़४दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील दहेल आणि उमरागव्हाण या दोन ग्रामपंचायतींकडून बँकेची माहिती मिळालेली नसल्याचे समजते़ तेथील ग्रामसेवकांकडून बुधवारी कागदपत्रांची पूर्तता होणार असल्याने तात्काळ निधी वाटप सुरू होणार आहे़