लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : ओबीसी लोकप्रतिनिधीचे आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या रिक्त जागांची निवडणूकदेखील घोषित केली आहे. साहजिकच मंगळवारपासूनच आचारसंहिताही संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमध्ये येथील पंचायत समितीमार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप होणाऱ्या वस्तूंचा नियोजित कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला. परिणामी आचारसंहितेमुळे १३० लाभार्थ्यांना फटका बसला आहे. असे असले तरी प्रशासनाच्या धोरणाबाबत लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे साहित्य तातडीने वाटप करावे, अशी दिव्यांगांची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग सशक्तीकरणासाठी त्यांना साहाय्य करणाऱ्या वस्तू मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यात व्हिलचेअर, श्रवण यंत्र अशा अनेक वस्तू मंजूर करून जिल्ह्यातील पंचायत समितीकडे पाठविल्या आहेत.
तळोदा शहाराबरोबरच ग्रामीण भागातील अशा १३० दिव्यांगांना या वस्तू देण्याचे पंचायत समितीचे नियोजन आहे. या वस्तूंच्या वितरणासाठी बुधवारी पंचायत समितीने कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. तथापि, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जिल्ह्यातील रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने पंचायत समितीनेही वस्तू वाटपाचा कार्यक्रम रद्दच केला आहे. साहजिकच दिव्यांग लाभार्थ्यांना वस्तू मिळाल्या नाहीत. प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीअभावी कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात सुरू होती. वास्तविक बुधवारच्या नियोजित कार्यक्रमासाठी संबंधित लाभार्थ्यांना पंचायत समितीकडून निरोप देण्यात आला होता. त्यामुळे बहुसंख्य लाभार्थी आपली वस्तू घेण्यासाठी पायपीट करत पंचायत समितीत आले होते. मात्र, वस्तूच न मिळाल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागले होते. पंचायत समितीच्या भूमिकेबाबत लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारपासूनच स्थानिक पंचायत समितीच्या स्तरावर वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. आता निवडणूक संपल्यानंतर वस्तू देणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिनाभर तरी लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या वस्तूची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन महिन्यांपासून वस्तू धूळ खात
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हा परिषदेकडे दिव्यांगांच्या वस्तू प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेनेदेखील वस्तू पंचायत समितीकडे दोन महिन्यांपूर्वीच पोहोचविल्या होत्या. त्यामुळे वस्तू दोन महिन्यांपासून गोडाऊनमध्ये धूळ खात पडून आहेत. वस्तूंच्या सुट्या भागांची फिटिंग करण्यासाठी अवधी लागल्याचे सूत्रांनी सांगितले असले तरी हे काम आटोपून अनेक दिवस झाले आहेत. त्यामुळे लगेच वाटपाचे नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या वेळेअभावी वाटप करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक अपंगांना आधारासाठी साहित्याची नितांत गरज असताना केवळ आचारसंहितेचे कारण पुढे करून वस्तूंपासून त्यांना वंचित ठेवणे चुकीचे असल्याचा सूर त्यांनी व्यक्त केला होता. निदान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून दिव्यांगांचा मार्ग मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते वाटप
तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूंचे वाटप बुधवारी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते व खासदार डॉ. हीना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, समाज कल्याण अधिकारी देवीप्रसाद नांदगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होते. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दिव्यांगांचे साहित्य मिळणार असल्याने साहित्य घेण्यासाठी तळोद्याला आलो होतो. परंतु, कार्यक्रमच रद्द झाल्याने निराश होऊन परत आलो. साहित्याची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. - नंदराज राजपूत, लाभार्थी, कढेल, ता. तळोदा.