लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात १२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह आलेल्यात नंदुरबार येथे ३४, शहादा ३६, नवापूर ३७, तळोदा ११ तर अक्कलकुवा येथील चौघांचा समावेश आहे़ बाहेरील जिल्ह्यातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़कोरोनामुळे जिल्ह्यात आजवर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ९५० जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ मंगळवारी दुपारी नंदुरबार शहरातील राजेंद्र नगर, मेहतर वस्ती, वैशाली नगर, शारदा नगर, अजय नगर, दंडपाणेश्वर कॉलनी, नेहरु नगर, अरिहंत नगर याठिकाणी प्रत्येकी एक, तुलसी विहार येथे ४ तर तालुक्यातील रनाळे येथे ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे एकाच दिवसात १७ रुग्ण आढळून आले आहेत़ तळोदा येथील खान्देशी गल्लीत २ तर गणपती गल्ली अणि श्रॉफ बाजार येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़ शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे आणि सावखेडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यात आली होती़ दरम्यान रात्री उशिरा ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ यामुळे दिवसभरात १०० पेक्षा अधिक जणांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह ठरले़दरम्यान मंगळवारी ५० रूग्ण बरे होवून घरी परतले होते़ सकाळी तळोदा येथील सात तर दुपारी जिल्ह्यातील विविध भागातील ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले़ यातून जिल्ह्यात ८७७ रुग्ण उपचार घेत आहेत़ यात नंदुरबार येथील ३५५, शहादा २६४, तळोदा ९३, नवापूर १३०, अक्कलकुवा १२ आणि धडगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे़ बाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कोविड हॉस्पिटल, एकलव्य केअर सेंटर, सलसाडी ता़ तळोदा, मोहिदा ता शहादा या शासकीय उपचार कक्षांसह नंदुरबार शहरात दोन खाजगी कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहे़
मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वाघोदा शिवारातील ८७ वर्षीय वृद्धाचा तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रनाळे ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत़ खांडबारा येथे १८ आणि रनाळे येथे पाच रुग्ण आढळल्याने ग्रामीण भाग हॉटस्पॉट ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागात उपाययोजनांना गतीची गरज आहे़