कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी लसीकरण सर्वांत उपयुक्त असल्याने सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, या जनजागृतीसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशाच्या वतीने तालुक्यातील मनरद येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरात ४५ वर्षे वयोगटावरील १२० महिला व पुरुषांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिकांनी लसीकरण केले. यावेळी सरपंच बनीबाई भिल, उपसरपंच दीपक पाटील, मुकेश पाटील, पोलीस पाटील नीलेश पाटील, तलाठी पंकज पवार, ग्रामसेवक एस. एस. गिरासे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका, लाभदायक माध्यमिक शाळेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आदींनी परिश्रम घेतले.