सविस्तर वृत्त असे की, शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या २५ आहे. मात्र, त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. त्यात परिरक्षण भूमापक (शहादा शहर), निमतानदार क्रमांक २, परीक्षण भूमापक लोणखेडा, प्रतिलिपी लिपिक, छाननी लिपिक, अभिलेखपाल, भूकरमापक, दप्तरबंद, शिपाई दोन यांचा समावेश आहे. वनजमीन मोजणीचे काम महत्त्वाचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चार भूकरमापकांना धडगाव येथे महिनाभरापासून वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत या कार्यालयात १४ जागा रिक्त आहेत. शहर व तालुक्यातील नागरिकांची शेतजमीन, प्लॉट मोजणीची कामे रखडली आहेत, तसेच ग्रामीण उतारे, चतु:सीमा, फेरफार प्रकरणे, उतारे देणे, वारस लावणे, प्रॉपर्टी कार्ड काढणे आदी कामांसाठी वारंवार चकरा मारूनही कामे होत नसल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन प्रवास भाड्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
प्रकाशा येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी
ग्रामीण भागातील जनतेला उतारे देणे, मिळकत पत्रिका फेरफार, वारसतक्ता आदी कामांसाठी शहादा तालुक्यात सजानिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार सारंगखेडा, लोणखेडा, कुकडेल या सजांना अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, प्रकाशा येथे त्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. प्रकाशा सजेतील कामे करण्यासाठी नागरिकांना शहादा येथे जावे लागते. त्यामुळे प्रकाशा सजेसाठीही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.