नंदुरबार- शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाईन सभेला विरोध म्हणून भाजपच्या विरोधी गटाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. दरम्यान, सत्ताधारी गटाचे बहुमत असल्याने अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यात मालमत्ता कराची नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांत भरणा केल्यास १० टक्के सूट देण्याचा निर्णयाचा समावेश आहे. नंदुरबार पालिकेची ऑनलाईन सभा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. परंतु ऑनलाईन सभा घेऊन सत्ताधारी वेळ मारून नेतात, चर्चा होत नाही त्यामुळे सभा ऑनलाईन घ्यावी व सर्व विषयांवर सविस्तर चर्चा घडावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. याबाबत गटनेते चारूदत्त कळवणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. त्यामुळे आजच्या ऑनलाईन सभेवर भाजपतर्फे बहिष्कार टाकण्यात आला.
सत्ताधारी गटातील उपस्थित नगरसेवकांनी अजेंड्यावरील सर्व १२ विषयांना मंजुरी दिली. मालमत्ता कराची नोटीस आल्यानंतर सर्व कराच्या रक्कमा एकरकमी ३० दिवसांत भरल्या तर १० टक्के सूट देण्याचा निर्णय यावर्षीही घेण्यात आला. त्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय व्यायामशाळांसाठी साहित्य खरेदी करणे. नवीन प्रशासकीय इमारतीत फर्निचर, विद्युतीकरण यासाठी येणाऱ्या संभाव्य खर्चास मंजुरी देण्यात आली. शेती विभागात समाविष्ट असलेेले क्षेत्र त्यातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या चार विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
बैठकीत नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, सभापती कैलास पाटील यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक सहभागी झाले होते.