- चंद्रशेखर पाटीलमुखेड ( जि.नांदेड ) : प्रधानमंत्री आवास योजनेतील माझे देयक का काढत नाही? असे म्हणत एका युवकाने आज, सोमवारी ( दि. २८ ) सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांच्या समोरच अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. मात्र, तात्काळ एका सामाजिक कार्यकर्त्याने आगपेटी काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
तालुक्यातील बेरळी बु.येथील मारोती आनंदराव जुन्ने यांनी आपल्या वडीलांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजना या योजनेतून वडील आनंदराव जुन्ने यांच्या नावाने घरकुल योजना घेतली होती. पण वडील आनंदराव जुन्ने यांचे दिनांक ६ जुलै २०२५ रोजी निधन झाले असून यापूर्वी त्यांनी या योजनेतील तीन हप्ते घेतलेले आहेत. पण घराच्या पायाभरणीचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ कामगारांचे नावे देऊन मस्टर देयके रु.१८ ,५०० ऐवढी रक्कम प्रलंबित आहे. वारंवार मागणीकरून गटविकास अधिकारी व घरकुल अभियंता यांना सांगूनही रक्कम न मिळाल्याने सोमवारी सकाळी गटविकास अधिकारी यांच्या दालनात एका बाटलीत आणलेले डिझेल अचानक अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर यांनी ताबडतोब आग पेटविण्यासाठी असलेली डब्बी हिसकाटून घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
चौकशी करण्यात येईलएकंदरीत तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल घोटाळा मोठ्या प्रमाणात असून तालुक्यातील लाखो लोकांचे स्थलांतर झाल्याने अश्या लोकांना घरकुल योजना मिळण्यासाठी रक्कम वसुलीसाठी गावागावात एजंट नेमण्याची चर्चा पंचायत समिती आवारात नागरिक करीत होते. दरम्यान, या प्रकरणी मस्टर देयकाची चौकशी केली जाईल अशी माहिती गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड यांनी दिली आहे.