जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर
नांदेड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना विविध विषयांचे प्रशिक्षण व ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषोच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी गुरुवारी केले.
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अक्ष्यक्षपदाला आज एक वर्ष पूर्ण झाले. जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्मा सतपलवार, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, कोरोनाच्या संकटकाळातही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका यांच्यासह आरोग्य विभागाच्या सहकार्याने केलेली कामे राज्यात प्रभावी ठरली आहेत. विशेषत: अनुकंपाधारकांचा खूप वर्षांपासूनचा प्रश्न प्रलंबित होता. सुमारे ११२ अनुकंपाधारकांना जिल्हा परिषद नोकरीत सामावून घेण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. विकासात्मक कामकाजासाठी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेऊन कामे करण्यात आली आहेत.
आगामी काळात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर केलेल्या सर्व संकल्पांची पूर्ती करण्यासाठी अविरतपणे काम करणार आहे. जास्तीत जास्त निधी विकासासाठी मिळावा, अशी मागणी नुकतीच पालकमंत्र्यांकडे केलेली असून अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागतील, असे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या नववर्ष दैनंदिनी डायरीचे प्रकाशन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांचा शाल, बुके व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांनीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा वर्षपूर्तीनिमित्त बुके देऊन सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक व पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद व्यवहारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर सुनील अटकोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.