नांदेड- नवीन नांदेडातील बळीरामपूर येथील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा होत असलेला विवाह महसूल पथक आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने रविवारी रोखण्यात आला. विशेष म्हणजे एका शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या नवऱ्या मुलाने हा विवाह रोखतो कोण अशी भूमिका घेत विवाहाची तयारी केली होती. देगलूर तालुक्यातील कुडली येथील बालविवाहही रोखण्यात आला आहे.
नवीन नांदेडातील बळीरामपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा 4 मे रोजी झाला होता. तेव्हाच या बालविवाहाबाबत एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने मुलीच्या आई वडिलांचे समुपदेशन केले होते. मात्र एका शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या भावी नवरदेवाने लग्न करूच अशी ठाम भूमिका घेत 6 जून चा मुहूर्त काढला होता. कौठा येथील साईबाबा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार होता. याबाबत नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांच्याकडे माहिती प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच तहसीलदार अंबेकर आणि महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे, मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर, महसूल सहायक संदीपकुमार नांदेडकर, वसरणीचे तलाठी प्रदीप उबाळे आदींनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या पालकांना समज दिली. त्यांच्याकडून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह केला जाईल असा जबाब लिहून घेतला. त्यानंतर आज रविवारी होणारा हा बालविवाह रोखण्यात यश आले.
दरम्यान आज रविवारीच देगलूर तालुक्यातील कुडली येथे होणारा बालविवाह ही समुपदेशन करून थांबविण्यात आला. येथे एका 16 वर्षीय बलिकेच्या विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. स्थानिक प्रशासन, मरखेल पोलीस आणि नांदेड चाईल्ड लाईनच्या मदतीने विवाह रोखण्यात आला.