बुधवारी जिल्हा रुग्णालयातील ९, किनवट कोविड सेंटरमधील ३, हदगाव येथील १, नांदेड मनपाअंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटरमधील २६६, भोकर तालुक्यातील १, खासगी रुग्णालयातील ४०, अर्धापूर तालुक्यातील २ आणि धर्माबाद तालुक्यातील १ अशा ३२३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार १४ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे बाधित रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णालयावरील ताणही कमी होत आहे. बुधवारी सायंकाळी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठीच्या १२३ खाटा शिल्लक होत्या, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्येही ११८ खाटा रिकाम्या झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
चौकट ------------------
नांदेड शहरात ७१ बाधित आढळले
बुधवारी कोरोना तपासणीचे ३ हजार २४५ अहवाल प्राप्त झाले. यातील १५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये सर्वाधिक ७१ बाधित रुग्ण नांदेड शहरातील आहेत. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३१, तर ॲन्टिजन तपासणीद्वारे ४० बाधित रुग्ण निष्पन्न झाले. आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे देगलूरमध्ये ३, किनवट, नायगाव, हदगाव, उमरी, भोकर येथे प्रत्येकी २, लोहा, अर्धापूर, हिमायतनगर, चंद्रपूर, हिंगोली येथे प्रत्येकी एक, तर मुदखेड, कंधार आणि मुखेड येथे प्रत्येकी ३ बाधित रुग्ण निष्पन्न झाले. ॲन्टिजन तपासणीद्वारे बिलोली, औरंगाबाद, देगलूर, अर्धापूर, हदगाव, नागपूर येथे प्रत्येकी एक, कंधार, मुखेड, किनवट, नायगाव, भोकर, हिमायतनगर, माहूर, नंदुरबार येथे प्रत्येकी २, हिंगोली, लोहा येथे प्रत्येकी ३, तर नांदेड ग्रामीणमध्ये १८ बाधित रुग्ण निष्पन्न झाले.
नायगाव, भोकर, उमरी सेंटरमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण
मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात चिंताजनक बनली होती. त्यावेळी शासकीय कोविड सेंटरबरोबरच खासगी कोविड सेंटरमध्येही बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोविड सेंटरमधील खाटाही वेगाने रिकाम्या होत आहेत. बुधवारी नायगाव, भोकर आणि उमरी या तीन कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू होते, तर हदगाव कोविड सेंटरमध्ये ३, लोहा येथे ७, धर्माबाद येथे ५ आणि एनआरआय कोविड केअर सेंटर नांदेड येथे केवळ ४ रुग्ण उपचार घेत होते. खासगी रुग्णालयांतही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांत मिळून आता केवळ ७६ जण उपचार घेत आहेत.