जिल्हा समन्वयकपदी हांडे
नरसीफाटा - बिलोली तालुक्यातील मौजे अंजनीचे सरपंच महेश हांडे पाटील यांची सरपंच परिषदेच्या नांदेड जिल्हा समन्वयकपदी निवड झाली. ऑनलाईन बैठकीत प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश महासचिव विकास जाधव, महिला आघाडीच्या राणी पाटील, मराठवाडा समन्वयक प्रा. प्रल्हाद वाघमारे यांनी ही निवड जाहीर केली.
गांजापूरकर तालुकाध्यक्षपदी
नांदेड - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी अजिंक्य गांजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी खानसोळे
मुदखेड - कामळज येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम पाटील खानसोळे तर उपाध्यक्षपदी संजय पाटील खानसोळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे सरपंच दीपाली खानसोळे, उपसरपंच सदानंद पांचाळ आदींनी स्वागत केले. दोघांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बीट जमादार शिंदे, आल्लेवार यांची उपस्थिती होती. यानंतर ग्रामविकास अधिकारी आर.के. कांबळे, कैलास खानसोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
अर्जुन चौदंते यांची निवड
नांदेड - भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या जिल्हा संघटकपदी अर्जुन चौदंते यांची निवड झाली. याअगोदर केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन चौदंते यांची ही निवड करण्यात आल्याची माहिती दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बी.एम. वाघमारे यांनी दिली.
३५ लाखांचा निधी
मुखेड - जिल्हा परिषद नांदेडकडून बाऱ्हाळीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. दोन वर्षापासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. इमारत पाडून नव्याने बांधण्यात यावी त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा म्हणून माजी सरपंच राजन देशपांडे, विद्यमान सरपंच अंजली देशपांडे, उपसरपंच व्यंकटराव वळगे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
भाजीपाल्यांचे भाव गडगडले
देगलूर - संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडले आहेत. भाजीपाल्याचे उत्पादन झाल्यानंतर लगेच त्याची विक्री करावी लागते. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे. परिणामी शहरातील वसाहतीमध्ये फिरून भाजीपाला विक्री केली जात आहे. मात्र त्यातूनही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने उत्पादक त्रस्त आहेत.
हळदीची लागवड सुरू
हदगाव - हदगाव तालुक्यातील शेतशिवारात उन्हाळी मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे, अशांनी आपल्या शेतात हळद व भूईमुग लागवडीचे काम सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकावर आशा लागली. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने हा पाऊस समाधानकारक राहावा असेही शेतकऱ्यात बोलले जाते.
नेटवर्क सेवा विस्कळीत
किनवट- विविध खासगी कंपन्या तसेच बीएसएनएल कंपनीची नेटवर्क सेवा विस्कळीत होत असल्याने त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अनेकांची कामे यामुळे खोळंबत आहेत. तसेच सेवा सुरळीत न झाल्याने कामाचा ताणही वाढत आहे. संबंधित कंपन्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
टरबूज उत्पादक अडचणीत
किनवट - तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी कोरोनामुळे संकटात सापडले आहेत. अल्पदराने टरबुजाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापारी टरबुजाच्या शेतीकडे फिरकूनही पाहत नाहीत. त्यातच उन्हाळी वातावरणात बदल झाल्यामुळे टरबूज शेतातच खराब होत असल्याचे चित्र आहे. शिवाय नागरिकही अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडत असल्याने टरबूज उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
माता कन्यका परमेश्वर जन्मोत्सव
नायगाव - आर्य वैश्य समाजाच्या वतीने नरसी येथे माता कन्यका परमेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय पांपटवार, पांडुरंग बच्चेवार, विजयाताई काचावार, विठ्ठल पाटील, नागेश चिंतावार, नारायण देवशटवार, अनिल शिरमवार, मारोती कुट्टेवार, निखील चिंतावार, प्रभाकर कवटीकवार, संतोष कवटीकवार, सतीश पत्तेवार, दीपक रुद्रावार, नितीन तुप्तेवार आदी उपस्थित होते.
पीक कर्जासाठी धावपळ
किनवट - पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेकडे धावपळ सुरू आहे. लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे पेरणीही आटोपती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बी-बियाणे खतासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असून अनेक जण बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र बँकांमध्ये दलालांची चलती आहे. ज्यांचा वशीला आहे त्यांनाच कर्ज दिले जाते, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
डाएटची ऑनलाईन कार्यशाळा
बिलोली -डाएटच्या वतीने १९ मे रोजी बिलोली तालुकास्तरीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विशेषज्ञ, विशेष शिक्षक आदींचा सहभाग होता. दोन सत्रामध्ये ही कार्यशाळा पार पडली.
अवैध दारूची विक्री
किनवट - तालुक्यातील सकुनानाईक तांडा येथे अवैध दारूची विक्री जोरात सुरू आहे. दारू विक्रीसाठी बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी मांडवी पोलिसांकडे केली. निवेदनावर कैलास चव्हाण, अर्जुन राठोड, नीलेश राठोड, सचिन राठोड, अर्जुन आडे, अरविंद चव्हाण, अविनाश पवार, बबन राठोड, काळू राठोड, प्रल्हाद चव्हाण, अजय राठोड, सुरेश चव्हाण, अविनाश चव्हाण, नितीन जाधव, हेमसिंग पवार यांची नावे आहेत.