नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीट हॉल परिसरातील गाळ्यांसमोर अवकाळी पावसाचे पाणी साचून लाखो रुपयांची हळद भिजली. यात व्यापाऱ्यांसह काही शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या परिसरात नाल्या नसल्याने आणि इतर ठिकाणचे पाणीही याच ठिकाणी येऊन साचल्याने धावपळ करूनही हळदीचे संरक्षण करता आले नाही.
नवीन मोंढा परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून लाखो क्विंटल हळदीची दरवर्षी खरेदी करण्यात येते. बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात; परंतु मागील काही वर्षांपासून बाजार समितींकडून शेतकऱ्यांऐवजी व्यापारी, खरेदीदारांचेच हित जोपासले जात आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील बहुतांश गोडाऊनवर व्यापाऱ्यांचाच ताबा आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल टाकू दिला जात नाही. यासंदर्भात समितीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही गोडाऊन खाली करण्यात आलेले नाहीत. व्यापारी अथवा शेतकरी पंधरा ते तीस दिवसांपर्यंत माल ठेवू शकतात; परंतु, मागील अनेक महिन्यांपासून काही प्रस्थापित व्यापाऱ्यांचा गोडाऊनवर ताबा असल्याने हंगामातील माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागाच मिळत नाही. परिणामी शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी साचून हळद भिजली. शेतकऱ्यांची ही नुकसानभरपाई कोण भरून देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हळदीबरोबरच काही व्यापाऱ्यांचा चना, तूरही भिजली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
चौकट
आतापर्यंत दीड लाख कट्टे हळद खरेदी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ५४ हजार ७०७ कट्टे हळद खरेदी करण्यात आली आहे. साडेसहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तसेच भुईमूग शेंगा ९ हजार ३८७ पोती, ज्वारी १ हजार ३६ कट्टे, चना- ११ हजार ९८७, तूर - १ हजार ९२२ कट्टे, सोयाबीन - १२ हजार ९४८, तर गहू ११२२ कट्टे खरेदी करण्यात आले आहेत.
जवळपास चाळीस पोती हळद विक्रीसाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे विक्रीसाठी आणली होती. माल दुकानासमाेर टाकलेला होता. त्यातील बहुतांश हळद शुक्रवारच्या पाण्याने भिजली. ही नुकसानभरपाई कोण भरून देणार. - नानाराव कदम, शेतकरी गणपूर.
बाजार समितीच्या परिसरातील काही व्यापाऱ्यांचा माल अवकाळी पावसामुळे भिजला आहे. ही नैसर्गिक हानी आहे. शेडमध्ये जागा उपलब्ध आहेत; परंतु सदर माल विक्रीसाठी बाहेर ठेवलेला होता आणि त्याचवेळी अचानक पाऊस येऊन शेतमाल भिजला आहे. यासंदर्भाने काही तक्रार आली तर चौकशी करू. -
साहेबराव बाऱ्हाटे, सचिव, कृउबा समिती, नांदेड.