नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत होते. परंतु दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह होती. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लाटेत तब्बल दोन महिन्यांहून अधिक दिवस लॉकडाऊनमध्ये नागरिक अडकून पडले होते. आता मात्र रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार, विवाह समारंभ, कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गासह सर्वच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला काही तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्ग धास्तावला होता. लग्नसराई, सण-समारंभांचे सिझन हातचे गेले होते. त्यामुळे लॉकडाऊनमधून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, जिम, लग्न समारंभ यासह सर्वच कार्यक्रमांना पहिल्या स्तरात असल्यामुळे मुभा मिळाली आहे.
काय सुरू राहील?
नांदेड जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पहिल्या स्तरात येतो.
त्यामुळे या ठिकाणी मॉल, जिम, थिएटर यासह सर्वच बाबी उघड्या राहणार आहेत.
सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि इतर प्रवासी गाड्यांनाही आता पूर्ण क्षमतेने वाहतूक करता येणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून मॉल, जिम यासह इतर सार्वजनिक ठिकाणे बंद होती. ती आता उघडण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट यासह खानावळी, लग्न समारंभ यांनाही परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वच व्यवहार राहतील सुरू
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त १.९३ असल्यामुळे नांदेडचा समावेश पहिल्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. पहिल्या स्तरात दुकाने व इतर व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवता येणार आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या नियमानुसार पूर्वीप्रमाणे आपले व्यवहार सुरु ठेवता येतील. परंतु व्यवहार सुरू ठेवताना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीलाही मुभा आहे. परंतु इतर राज्यातील वाहतुकीसंदर्भात काही नियम व अटी घालून दिल्या आहेत.