अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपालपदांची भरती सुरू करणे व ४ मे २०२० रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासननियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदांच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. २०२० पर्यंतची ग्रंथापालांची पदभरती करावी तसेच खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांची नियुक्ती विद्यापीठ नियमांना अधिन राहून वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
महाविद्यालयातील ग्रंथपालपदाच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाने सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांना मंगळवारी निवेदन दिले. पदभरतीचा शासन निर्णय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत नांदेड सहसंचालक कार्यालयांसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने, माधव शिंदे, फय्याज सय्यद, डॉ. रमाकांत आरदवाड, धनंजय तिगोटे उपस्थित होते.
आत्महत्याची परवानगी मागितली –
शासनाला जोपर्यंत पात्रताधारक आत्महत्या करणार नाही तोपर्यंत जाग येणार नसेल तर मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री व वित्तमंत्री यांनी आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्यातील पात्रताधारकांनी निवेदनात केली आहे.
कोट –
मंत्री महोदयांनी आठ दिवसांत शासन निर्णय काढण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यामुळे जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत राज्यातील दहा सहसंचालक कार्यालयांसमोर बेमुदत साखळी उपोषण आम्ही करणार आहोत.
- डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ