स्नेहनगर पोलीस कॉलनीत चोरी
शहरातील स्नेहनगर भागातील पोलिस कॉलनीमध्ये १३ मे रोजी चोरीची घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण भंडरवार हा विद्यार्थी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेला असताना, रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरटा घरात शिरला. यावेळी चोरट्याने २ हजार रुपये किमतीची घड्याळ आणि ६ हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महामार्गाच्या कामावरील केबल केले गायब
औरंगाबाद ते निर्मल या महामार्गाचे काम सध्या सुरू असून, चोरट्याने अंडर ग्राउंड टाकण्यात येणारे ७० हजार रुपयांचे केबल लंपास केले आहेत. ही घटना १२ मे रोजी घडली. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औरंगाबाद ते निर्मल या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी साइट इलेक्ट्रिकल इंजिनीअर नितीन माडगूळकर हे गेले होते. मालेगाव परिसरात पाहणी दरम्यान त्यांना केबर वायर गायब असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता, चोरट्याने ७०हजार रुपये किमतीची ७५ मीटर केबल वायर लांबविल्याचे पुढे आले. या प्रकरणात त्यांनी ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.हुंडे हे करीत आहेत.
पत्नीच्या वेतनातील पैशासाठी छळ
पत्नी शासकीय नोकरदार असून, पगारातील पैसे का देत नाही, म्हणून पतीकडून तिचा छळ करण्यात येत होता. ही घटना राजसारथी नगर भागात घडली. पैशाच्या मागणीसाठी पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विष प्राशन करून आत्महत्या
लोहा तालुक्यातील कापशी येथे तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंडीबा गंगाधर देवदे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. १२ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने विष प्राशन केले, परंतु आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप कळाले नाही. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.