कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन इतर पर्यायांचा विचार करत होते. मागील दीड महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून कोणताही पर्याय निश्चित होत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले होते. परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेऊन मानसिक तणाव कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, आता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी झाला आहे; परंतु मूल्यमापन कशा पद्धतीने होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
प्राचार्य म्हणतात
१. बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी शाखांच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण निर्माण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्यांना अडचणीचे जाणार नाही.
-पवळे, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज, नांदेड
२. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष समोर आल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विद्या शाखांच्या प्रवेशाबाबतचा मार्ग या मूल्यमापनाच्या आधारेच सुटेल. -
विद्यार्थी म्हणतात-
१.मागील दीड महिन्यांपासून आम्ही या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. त्यामुळे आमचे अभ्यासात मन लागत नव्हते. परीक्षा होणार की नाही, हाच विचार येत होता. मात्र, आता या निर्णयामुळे समाधानी आहोत. मूल्यमापनाचे धोरण लवकर जाहीर करावे .
- यश लोंढे, विद्यार्थी
२. शासनाने यापूर्वीच हा निर्णय जर घेतला असता तर आम्ही मोकळ्या मनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचा अभ्यास करू शकलो असतो. आमचा मोठा वेळ वाया गेला आहे.
- शिवराज इंगळे, विद्यार्थी
पालक म्हणतात-
१. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, कोरोनामुळे ती घेता येणार नव्हती. शासनाने योग्यच निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करावे.
- सोमनाथ लांडगे, पालक
२. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य असून हा निर्णय अगोदरच घेणे आवश्यक होते. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करण्यास वेळ मिळाला असता. - भास्कर जाधव, पालक
बारावीनंतरच्या संधी
१.बारावीनंतर देशातील काेणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार या क्षेत्रात संधी आहेत.
२. एमबीबीएस व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील नीट गुणांच्या आधारे दिले जातात.
३. बारावीनंतर फार्मसीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. डी. फार्मसी हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येते.
४. बारावीची परीक्षा गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर या शाखेत प्रवेश मिळू शकतो. ही पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी नोकरी मिळू शकते.