नांदेडची लोकसंख्या वाढल्याने व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेला महत्व न दिल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातील गोदावरी नदीचे प्रदूषण ही एक मोठी समस्या होय. याचे दुष्परिणाम येत्या काळात जाणवण्याचा अगोदर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. गोदावरी नदीतील पाण्याची प्रदूषण पातळी वाढली आहे. यामुळे सध्या जलपर्णीची वाढ ही गतिशीलपणे होत आहे. पाण्यातील माशा मरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता मोहीम आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमी राबवत आहेत. समाजात जनजागृती करून यास आळा बसवणे हा उद्देश या मागचा आहे, असे प्रतिपादन संतोष मुगटकर यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली असून येत्या तीन रविवारी सतत नदी घाट स्वच्छतेची मोहीम चालणार आहे. लोकांनी यात सहभाग घ्यावा असेही आवाहन टीमच्या वतीने त्यांनी केले. घरातूनच कचरा व कमीत कमी घाण पाणी नदी पात्रात आले नाही पाहिजे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एक थेंब दूषित पाण्यामुळे हजारो लिटर पाणी दूषित होते. लोकांना नदी पात्रात कचरा टाकू नये म्हणून जनजागृती या मोहिमेत केली जाणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन समाज, शासन, लोकप्रतिनिधी व बुद्धिजीवी लोकांच्या समन्वयकाने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करूया असे मत जलअभ्यासक प्रा. परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रीतम भराडिया यांनी नदीमध्ये घाण टाकून नदीचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. मोहिमेमध्ये वृक्षमित्र प्रीतम भराडिया, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रहलाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, अरूणपाल ठाकूर, मनोज गुंजावळे, लक्ष्मण गज्जेवार, नानाजी रामटेके, सतीश कुलकर्णी, शैलेश शहाणे, मालू, मनपा स्वच्छता निरीक्षक ढगे, मनपा उद्यान अधीक्षक डॉ. बेग तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.