बारड (जि.नांदेड) : जिलेटिन वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचे मागील टायर निघाल्याने गाडी उलटून स्फोट झाला. त्यात गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या. घटनास्थळी २० फुटांचा खड्डा पडला. पांढरवाडी-मुदखेड रस्त्यावर डॉ. कुरे यांच्या शेतशिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोकर येथून (एम. एच.०९-एस.४९९९) या क्रमांकाचा महिंद्रा पिकअप व्हॅन जिलेटिन घेऊन मुदखेडच्या दिशेने पांढरवाडी-पार्डीमार्गे निघाले होते. सदर वाहन मुदखेडलगतच्या शिवारात असताना त्याचे मागील एक टायर निघाले आणि घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या. गाडीमधील जिलेटिन आता पेट घेणार असे लक्षात येताच वाहनचालकाने परिसरातील शेतकरी व नागरिकांना दूर जाण्यास सांगितले. यावेळी आनंदा बापूराव पवार व चांदशेख खुडुसाब यांच्या मदतीने वाहनचालक शिताफीने गाडीबाहेर पडला व दूर पळून गेला.
काही वेळांतच या गाडीचा मोठा स्फोट होऊन जागेवरच २० फुटांचा खड्डा पडला. स्फोटात गाडीचे प्रचंड नुकसान झाले. गाडीचे अवशेष ठिकठिकाणी उडून पडले. स्फोटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील आखाड्यावरील पत्रे बांधकाम केलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. जनावरांना मार लागला. प्राथमिक तपासणीत जमिनीमध्ये वावरणारे सापही मृतावस्थेत सापडले. यावेळी शेतावर असलेले बाळू बोडवान यांच्या हाताला मार लागून ते जखमी झाले. गणपत येलगुरे यांच्या हायब्रीड ज्वारीचे मोठे नुकसान झाले. चांदू आगलावे यांच्या काकडा शेती स्फोटाने उद्ध्वस्त झाली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की जवळपास १० ते १५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावात हा आवाज पोहोचला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, स्फोटाची माहिती घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या घटनेत जिलेटिनच्या कांड्या होत्या का अन्य कोणते पदार्थ होते, हे माहिती करून घेण्यासाठी घटनास्थळीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणा सर्व दृष्टीने तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.