शिवराज बिचेवार
नांदेड : नागपूर-गाेवा ८०२ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गावरून सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जुंपली आहे. विदर्भातील शेतकरी या महामार्गाच्या समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले आहेत. दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने दोन्ही भागांतील शेतकरी संभ्रमात आहेत. तर, दुसरीकडे महायुतीतील लोकप्रतिनिधींमध्येही एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.
समृद्धी महामार्गापेक्षाही अधिक लांबीचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून तो जाणार आहे. सुरुवातीला ७६० किलोमीटरचा असलेला हा महामार्ग आता ८०२ किलोमीटरचा होणार आहे.
विरोध कशामुळे ?
शक्तिपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहिन होतील, असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सतीश कुलकर्णी म्हणाले.
समर्थन का?
महामार्गामुळे विदर्भात ८ मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे उद्योगधंदे येतील अन् सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे महामार्ग समर्थन कृती समितीचे अध्यक्ष संजय ढोले म्हणाले.
महामार्गाला कोणाचाही विरोध नाही. ज्यांचा विरोध आहे त्यांना घेऊन आमदार माझ्याकडे येणार आहेत. चर्चा करू निर्णय घेऊ, परंतु महामार्ग होणारच आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
ज्या ठिकाणी विरोध होत असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू. समृद्धीलाही सुरुवातीला विरोध झाला, नंतर शेतकऱ्यांनी स्वत:हून आपल्या जमिनी दिल्या.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री