कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ.मोहन हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर मोहिनीताई येवनकर, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, सदस्य संतोष पांडागळे, डॉ.करुणा जमदाडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी अभ्यागत मंडळाचे पदाधिकारी व महापौर यांनी कोविड रुग्णकक्ष, स्वयंपाक घर, ऑक्सिजन टँक आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा २० के.एल.ऑक्सिजन टँक वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात येत आहे. चव्हाण यांनी डी.पी.डी.सी. व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकार्यांनी आपली जबाबदारी ओळखून रुग्णांची सेवा करावी, असेही आ.मोहन हंबर्डे व महापौर येवनकर यांनी सांगितले. अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे व डॉ.करुणा जमदाडे यांनीही रुग्णसेवेसाठी कांही महत्वपूर्ण सूचना केल्या. ही बैठक तब्बल दोन तास चालली.
रुग्णांची सर्वोतोपरी काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST