देश पुन्हा कोरोना संकटात सापडला आहे. गतवर्षी ऐन उन्हाळाच्या तोंडावर कोरोनाचे संकट आले. मार्च महिन्यात सुरू झालेले दुष्टचक्र यंदाच्या उन्हाळ्यातही संपले नाही. मागील वर्षी कसे तरी या संकटाला तोंड दिले. घरात होते त्यावर दिवस काढले. मात्र, यावर्षीही पुन्हा कोरोनामुळे रोजगार गेला. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणेच धोक्यात आले आहे. नांदेड शहरातील साडेपाच हजारांहून अधिक टेलरिंग व्यवसायात काम करणाऱ्या कारागिरांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.
ऐन सणासुदीच्या जयंती, उत्सव, लग्नसराईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातील सीझनही हातचा गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच लग्नसराईत घरातच बसावे लागले. टेलरिंग हाच एकमेव जगण्याचा मार्ग असल्यामुळे कारागिरांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
चौकट-
ऐन लग्नसराईच्या दिवसांत लॉकडाऊन असल्याने टेलरिंग व्यवसायाचा हंगाम हातून गेला आहे. त्यासोबतच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सणातही प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे आमचे जगणे अवघड झाले आहे.
- शेख जाफर, टेलर, देगलूरनाका, नांदेड.
चाैकट-
टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये आमच्या व्यवसायाला शिथिलता मिळावी, अन्यथा आमच्या जगण्याचा प्रश्न कठीण होईल.
- अरुण जाधव, मालेगावरोड, नांदेड