Study level confirmation after the session expiresed | सत्र संपल्यानंतर अध्ययनस्तर निश्चिती
सत्र संपल्यानंतर अध्ययनस्तर निश्चिती

ठळक मुद्देयुडायस प्लस : आॅनलाईनची कामे ऐनवेळी सोपविली

बिलोली : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ हे वर्ष संपत आले. एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेणे व निकालपत्रक तयार करण्यात येतात. त्यात भर म्हणजे युडायस प्लस व आॅनलाईनची अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील अध्ययनस्तर निश्चिती करावयाचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी सत्र सरतेशेवटी दिल्याने स्तरनिश्चिती करायची तरी कोणाची? हा प्रश्न शिक्षकांपुढे उपस्थित झाला आहे.
दरवर्षी सप्टेंबरमध्ये संचमान्यता, शालेय विकास आराखडा, शालेय पोषण आहार माहितीसह शाळेची भौतिक सुविधांची माहिती अपडेट करावयाची असते.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस युडायस प्लस ही २०१८-१९ शैक्षणिक वर्षीची माहिती भरुन देण्याविषयी केंद्रस्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. यासोबतच शालेय पोषण आहार, शिक्षकांची माहिती सरल शिक्षक प्रणालीमध्ये भरणे यासारखी कामे सत्र सरतेशेवटी करावयाचे आहेत.
एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय संकलित मूल्यमापन परीक्षा घेणे, गुणपत्रक तयार करणे, संकलित, आकारिक मूल्यमापन नोंदवही तयार करणे हे काम वेळेत पूर्ण करावी लागतात. ही कामे सुरु असतानाच युडायस प्लस व इतर कामे ऐनवेळी सोपविल्याने कामाचा व्याप वाढला आहे. त्यात शिक्षणाधिकारी नांदेड यांनी २४ एप्रिल रोजी अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
मुळात द्वितीय सत्र परीक्षा संपली आहे. कोणत्याच शाळेत विद्यार्थी उपस्थित नाहीत मग असे असतानाही अध्ययन स्तरनिश्चिती करणार तरी कोणाची? हा प्रश्न उभा आहे. स्तरनिश्चिती आॅनलाईन करावयाची आहे. विद्यार्थी शाळेत हजर नसताना शिक्षण विभाग पत्र काढून शासनदरबारी आपली पाठ तर थोपटून घेत नाही ना? याची चर्चा होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरु असताना काहीच उपक्रम राबवायचे नाही अन् सत्र संपल्यानंतर आटापिटा करायचा? हा प्रकार चांगला नसल्याची प्रतिक्रिया शिक्षक वगार्तून होत आहे.


Web Title: Study level confirmation after the session expiresed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.