किनवटच्या कोविड सेंटरला भेटी
किनवट : येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरला सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार व तहसीलदार उत्तम कागणे यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील पॉझिटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांकडून तपासणी सुरू आहे. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांना पुष्पगुच्छ व गोळ्यांचे किट दिले जात आहेत.
शिवभोजन थाळीला हदगावमध्ये प्रतिसाद
हदगाव : शहरातील छत्रपती चौक येथे सुरू असलेल्या शिवभोजन मोफत थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज १०० लोकांसाठी सकाळी ११ ते ४ या वेळेत थाळी उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना स्वत:च्या ओळखीचा पुरावा येथे द्यावा लागतो.
दिव्यांग, निराधारांना आर्थिक मदत द्या
हदगाव : ‘ब्रेक द चेन’मुळे संचारबंदी सुरू असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे दिव्यांग, निराधार, बांधकाम कामगारांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केली. या वेळी जमीर पटेल, कुबेर राठोड, सादिक पटेल, वाजीद पठाण, विष्णू तंत्रे, शेख जब्बार, फईमोद्दीन सरवरी, दीपक सूर्यवंशी, महेश राठोड, गजानन शिंगणे आदी उपस्थित होते.
दुचाकी लंपास
बामणीफाटा : हदगाव तालुक्यातील वाकोडा येथील पांडुरंग भालेराव यांची एम.एच.२६ - एई ९६४६ या क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांना मात्र चोर सापडला नाही. त्यामुळे लोकांत चिंता पसरली आहे.
सॅनिटायझर फवारणी
मालेगाव : उमरी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. या वेळी सरपंच परमेश्वर ढवळे, उपसरपंच अर्जुन गवळी, सदस्य - बसवेश्वर पडोळे, शिवदास गुंडले, सोनाजी गवळी, ग्रामसेवक उत्तम धरणे आदी उपस्थित होते. या वेळी सरपंचांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जावळे यांना अभिवादन
धर्माबाद : अण्णासाहेब जावळे पाटील यांना शुक्रवारी येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी साईनाथ पाटील, छावाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील, कार्याध्यक्ष दिगांबर पाटील, तालुकाध्यक्ष इरेश पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
तरुणाला मारहाण
कंधार : तालुक्यातील वहाल येथे एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १४ एप्रिल रोजी घडली. शिवाजी मुकनर हा घरी जात असताना चौघांनी त्याच्यासोबत वाद घालून दगडाने डोके फोडले. माळाकोळी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
रक्तदान शिबिर
हदगाव : येथील भीमजयंती मंडळाने आयोजित रक्तदान शिबिरात ३७ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना भीमजयंती मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराचे आयोजन हरीहरराव सोनुले चौकात करण्यात आले होते.
पुतळ्याचे अनावरण
किनवट : तालुक्यातील अंबाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष दिनेश लढे, उपाध्यक्ष सुभाष कयापाक, सचिव संजय तामागाडगे, किशनराव फालके, शेषराव लढे, वंचितचे तालुकाध्यक्ष किशनराव राठोड, मिलिंद मुनेश्वर, आनंदराव तेलंगे, रत्नाकर मुनेश्वर, दीपक कामगाडगे, श्रावण घुले आदी उपस्थित होते.