नांदेड : चालू हंगामातील एफआरपीची रक्कम भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांकडे बाकी आहे. कोरोनाकाळात शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. त्यामुळे सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शुभांशिष कामेवार यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील कारखान्याच्या चालू हंगामातील उसाची राहिलेली एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी दिल्यास मोठी मदत होणार आहे.
जनता दल सेलची बैठक
नांदेड : देशात अनेक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषद ही पांढरा हत्ती पोसण्यासारखा आहे. त्यांच्यावरील अवाढव्य खर्च वाचविण्यासाठी विधान परिषद बरखास्त करावी, अशी मागणी जनता दल सेलच्या ऑनलाइन बैठकीत राज्य उपाध्यक्ष पी. डी. जोशी यांनी केली आहे. बैठकीला सूर्यकांत वाणी, किरण चिद्रावार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, पारळकर, बालाजी आलेवार, महेमूद पठाण यांची उपस्थित होते.
सोयाबीन दरवाढीचा फटका
नांदेड : जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी सोयाबीन बियाणांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे खताचे भावही मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. त्यामुळे यावर्षी पेरणीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे.
विद्युतनगरात पाच दिवसांपासून निर्जळी
नांदेड : येथील विद्युतनगर व परिसरात मागील पाच दिवसांपासून मनपाकडून होणारा पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागात पाणीटंचाई निर्माण झाली. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. दरम्यान, दोन दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
निराधारांना कपडे वाटप
नांदेड : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष - संघटनांकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वैभव पांढरे यांच्या वतीने फुटपाथवर राहणाऱ्या निराधारांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी कुणाल पुरी, सुरेश हेंद्रे, सोनू शेळके आदी उपस्थित होते. शहरातील गोकुळनगर, गुरुद्वारा, रेल्वे स्टेशन यासह परिसरातील निराधारांना कपडे वाटप करण्यात आले.
राजभोज सेवानिवृत्त
नांदेड : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील लेखाधिकारी नितीन मनोहरराव राजभोज हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अल्केश शिरशेटवार, मिलिंद व्यवहारे, विशाल कदम, चैतन्य तांदुळवाडीकर, सुशील मानवतकर आदी उपस्थित होते.
साहित्य मंडळावर सिंदगीकर
नांदेड : साहित्यिक विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शासनाच्या प्रसिद्धी पत्रकान्वये ही निवड जाहीर केली आहे. साहित्यिक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली असून, या समितीत साहित्यिक सिंदगीकर यांची नियुक्ती केली आहे.
हस्सापूरमध्ये वृक्षारोपण
नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हस्सापूरमध्ये ३१ मे रोजी वृक्षारोपण करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी युवा मल्हार सेनेचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ काकडे, गजानन काकडे, पांडुरंग काकडे, मारोती काकडे, शैलेश काकडे, अमोल काकडे आदी उपस्थित होते.