नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडावे लागले आहे. त्यातही दुसऱ्या लाटेमुळे तर सर्वांना हैराण करून सोडले आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून घराघरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर संसार तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेलमध्ये लॉकडाऊनच्या काळात येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. प्रत्येक प्रकरणातील कारणे अफलातून आहेत. तक्रार घेऊन आलेल्या जोडप्यांचे या ठिकाणी योग्य समुपदेशन केले गेले. त्यांच्या कुटुंबियांनाही बोलाविण्यात आले होते. भरोसा सेलच्या या प्रयत्नामुळे जवळपास १९५ हून अधिक जणांचे तुटत आलेले संसार पुन्हा जुळले आहेत,
तर ज्या विषयात पती आणि पत्नीत तडजोड झाली नाही अशावेळी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडल्याने एकमेकांच्या सवयीबद्दलच्या कुरबुरी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरात चिडचिड करणे, किरकोळ कारणावरून वाद घालणे, मारहाण करणे, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोरोनापूर्वीपेक्षा आता कोरोनाच्या काळात भरोसा सेलमधील तक्रारींचा ओघ वाढला आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या विरोधात केलेल्या तक्रारींची संख्याही अधिक आहे, हे विशेष. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राहावा यासाठी त्यांना योग्य समुपदेशन करण्याची गरज आहे.
१९५ पती-पत्नीचे भांडण सोडविले
मार्च २०२० पासून २०२१ पर्यंत भरोसा सेलमध्ये एकूण ६५० तक्रारी आल्या होत्या. त्यातील १५५ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे,
तर जानेवारी २०२१ पासून मे महिन्यापर्यंत ३३३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील ४० प्रकरणांत समेट घडवून आणण्यात आला आहे.
भरोसा सेलमधील समुपदेशक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून तुटणारा संसार जोडण्यासाठी प्रयत्न करतात.