शेतकऱ्यांसमोर संकट
नरसीफाटा - कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्यामुळे मशागत करण्यासाठी बैल मिळणे अवघड झाले. पेरणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांनी केला. मशागतीसाठी बैलांचा वापर होतो. मात्र, आठवडी बाजार सध्या बंद असल्याने बैल मिळणे जिकिरीचे झाले आहे.
भाजी विक्रीसाठी हातगाडे कॉलनीत
नांदेड : शहरात संचारबंदी असल्याने मुख्य बाजारपेठेत भाजी, फळे विक्रीस बंदी आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळांचे हातगाडे गल्लोगल्ली फिरून विक्री करीत आहेत. यामुळे कॉलनीत हातगाड्यांची गजबज सुरू आहे. फळे विकत घेताना नागरिक सुरक्षित अंतरही ठेवत नाहीत.
सीडीएम यंत्रणा सुरू ठेवावी
नांदेड : शहरातील सर्वच बँकेचे कामकाज नागरिकांसाठी केवळ चार तास सुरू आहे. या कालावधीत अनेक ग्राहकांचे नंबर न लागल्याने त्यांना पैसे टाकणे किंवा काढणे हे व्यवहार करता येत नाहीत. यामुळे सर्व बँकांनी एटीएममध्ये सीडीएम मशीन उपलब्ध करून त्या सुरू ठेवाव्यात, अशी मागणी होत आहे.
आंब्याचे नुकसान
देगलूर : मंगळवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. सध्या आंबा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, वाऱ्यामुळे आंबा गळून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
दुकाने बंद, व्यवसाय सुरू
नांदेड : संचारबंदी काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नावालाच आहेत. दुकानाचे शटर बंद करून मागच्या दाराने व्यवसाय केला जात आहे. ही स्थिती सध्या शहरात सर्वत्रच पाहायला मिळते. याकडे महानगरपालिका पथक व पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.
तामसा येथे गुन्हा
हदगाव : हदगाव तालुक्यातील येवली येथील सुभाष खिल्लारे यांना एका व्यक्तीने हातउसणे पैसे दिले होते. त्या बदल्यात शेतजमीन आपल्या नावावर करावी असा तगादा सुभाषकडे लावण्यात आला होता. या तगाद्याला कंटाळून सुभाष याने आत्महत्या केली. तामसा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
घरात घुसून मारहाण
कंधार : तालुक्यातील फुलवळ येथे पूर्व वैमनस्यातून घरात घुसून दिलीपकुमार गोधणे व त्यांच्या नातेवाइकांना मारहाणीची घटना २६ एप्रिल रोजी घडली. यावेळी लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला. कंधार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
कुंडलवाडी फवारणी कधी
कुंडलवाडी : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फवारणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. कुंंडलवाडी व परिसरात कोरोनाबाधित व्यक्ती मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. काहींचा मृत्यूही झाला. मात्र, पालिकेने या घटनेची अद्यापही नोंद घेतली नाही. फवारणी सुरू केली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
टायफाईडचे रुग्ण वाढले
हिमायतनगर : वाढत्या उष्णतेेमुळे हिमायतनगर तालुक्यात टायफाईडचे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालये अशा रुग्णांनी फुल्ल झाले. मागील वर्षी कोरोनाच्या काळात अशा आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होती. यावर्षी हिवतापाचे प्रमाण वाढू लागले असून, त्यातून ताप, अशक्तपणा येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण दवाखान्याकडे जात आहेत.
टेलरला दंड
हिमायतनगर : लाॅकडाऊन नियमांचे पालन न करणाऱ्या हिमायतनगर येथील एका टेलरला पाच हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. नगरपंचायतीचे प्रशासक जीवराज डापकर यांनी ही कारवाई केली. याबाबतची माहिती मिळताच अन्य दुकानदारांनी ताबडतोब आपापल्या दुकानांचे शटर खाली ओढले. २८ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
पाण्यात बुडून मृत्यू
नांदेड : पावडेवाडी येथील विहिरीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी घडली. बालाजी सदाशिव चन्ने असे मृताचे नाव आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. पोलीस नायक नरवाडे अधिक तपास करीत आहेत.
परंपरा खंडित
हदगाव : तालुक्यातील मानवाडी येथील हनुमान जन्मोत्सवाची अनेक वर्षांपासूनची परंपरा यंदाही खंडित झाली. कोरोनामुळे हनुमान जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करीत पूजाअर्चा करण्यात आली, तर बरडशेवाळा, पळसा, मनाठा, बामणीफाटा, पिंपरखेड, चिंचगव्हाण, शिबदरा, पिंगळी, केदारनाथ, आदी ठिकाणीही भाविकांनी मंदिरात बाहेरून दर्शन घेऊन घरोघरी हनुमानाची पूजा केली.