नांदेड - शहर व जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर शहरात दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक व्यक्ती विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन येत असताना त्याला अडविण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडील दुचाकी व आणखी एक दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या दुचाकींसंदर्भात लिंबगाव आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे संशयिताला लिंबगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पुंगळे, अब्दुल रब, पोलीस नाईक गजानन किडे, संजय जाधव, चंद्रकांत बिरादार, परदेशी, बेलूरोड आदींनी केली.
हरसदमध्ये दुचाकी चोरी
नांदेड - लोहा तालुक्यातील हरसद येथे घरासमोर उभी केलेली शेतकऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हरसद येथील प्रल्हाद पांडुरंग कोल्हे यांनी आपली (एमएच २६ एई ६९५७) क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. कोल्हे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल हंबर्डे करत आहेत.