- शेख शब्बीरदेगलूर: तालुक्यातील गवंडगाव येथील दोन युवक उदगीरवरून परत येत असताना दुर्दैवी घटना घडली. मौ धडकनाळ (ता. उदगीर) येथील नाल्यास पुर आलेला असताना त्यामधून कार नेण्याचा प्रयत्न करताना गाडी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. या घटनेत एक तरुण पाण्यात बेपत्ता झाला, तर दुसऱ्याने झाडाला धरून अख्खी रात्र झुंज देत आपला जीव वाचवला. हा प्रकार रविवारी (दि. १७ ऑगस्ट) रात्री अकरा वाजता घडला.
गवंडगावचा नारायण नागेंद्र ईबीते (वय २८) आणि महेबूब अहमद पिंजारी (वय ३३) हे दोघे उदगीरहून कारने परतत होते. नाल्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानाही त्यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंदाज न आल्यामुळे गाडी थेट पाण्यात वाहून गेली.
दरम्यान, नारायण ईबीते यांनी प्रसंगावधान दाखवत झाडाला धरून जीव वाचवला. त्यांनी संपूर्ण रात्र झाडावर लटकून काढली आणि सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा सोबती महेबूब पिंजारी पाण्यात वाहून गेला. विशेष म्हणजे, त्याला पोहता येत नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सोमवारी दिवसभर प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, सायंकाळी सातपर्यंतही महेबूबचा शोध लागलेला नव्हता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.