- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड): आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा आज दुपारी अचानक 'पंचनामा' केल्याने एकच खळबळ उडाली. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरहजर असल्याने रुग्ण वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहून आमदार चव्हाण यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. आमदार श्रीजया चव्हाण यांचे रौद्ररूप पाहून अनेक जाण चकितच झाले. आरोग्य सेवेबद्दल हलगर्जीपणा केल्यास खैर नाही असा इशारा यावेळी आमदार चव्हाण यांनी दिला.
आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक पणे अर्धापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली असता सदर ठिकाणी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. तर लाईट नव्हती, स्वच्छता ,जनरेटर होते पण बंद होते तर अनेक डॉक्टर अनुपस्थित होते. आमदारांनी रुग्णालयाची दयनीय अवस्था पाहून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना फैलावर धरले. त्यानंतर अनेक जण रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले. एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर जबाबदार कोण? असा सवाल करीत त्यांनी डॉक्टरांना झापले.
रुग्णांना सर्वसामान्यांना नेहमी दर्जेदार सुविधा मिळाली पाहिजे. यापुढे रात्री बेरात्री वॉच राहणार असून हालगर्जीपणा केल्यास स्वतः जबाबदार राहाल. दोन दिवसात सुधारणा करा अन्यथा खैर नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदार श्रीजया चव्हाण यांची आक्रमक भूमिका पाहून अनेक जण यावेळी आश्चर्यचकित झाले. यावेळी सभापती संजयराव लहानकर, बालाजी गव्हाणे, प्रवीण देशमुख, छत्रपती कानोडे, उमेश सरोदे, गुरुराज रणखांब, चंद्रमुनी लोणे, राजू बारसे, सुरज माडे सह अनेक नागरिक रूग्ण यावेळी उपस्थित होते.