लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मोकळ्या भूखंडाची मालमत्ता कर न भरणा-या मालमत्ताधारकांना नोटीसा देवून देखील कर न भरल्यामुळे महापालिकेच्यावतीने भूखंड जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच दिवस ही मोहीम राबविल्यानंतर काहीसा खंड पडला होता. मात्र गुरुवारी महापालिकेच्या पथकाने आणखी ४६ भूखंड जप्त केले. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत मागील वीस दिवसांत तब्बल १६१ मोकळे भुखंड जप्त करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे.मनपाला उत्पन्नवाढीकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी वेगवेगळ्या स्वरूपातील थकीत कर वसूल करण्याकडे लक्ष दिले आहे. शहरातील अनेक मोकळ्या भूखंड धारकांनी कर थकविला आहे. अशा थकित मालमत्ताधारकांच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरु केली आहे़ त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ तरोडा सांगवीअंतर्गत मोकळ्या भूखंडाबाबत नोटीस देण्यात आली होती, परंतु मालमत्ताधारकांनी या नोटिशीला केराची टोपली दाखविली़ त्यामुळे महापालिकेने मोहिमेत क्षेत्रिय कार्यालय १ अंतर्गत येणा-या सांगवी, तरोडा भागातील ११५ भूखंड जप्त केले जप्त केले होते. सदर मालमत्तांवर महापालिकेची जप्ती नोटीस असलेले फलकही लावण्यात आले आहेत. पथकाच्या कारवाई दरम्यान काही जणांनी त्वरित धनादेश देवून जप्तीची कारवाई टाळली़ या कारवाईनंतर दहा दिवसांत ही मोहीम काहींशी थंडावल्याचे चित्र असतानाच गुरुवारी महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्र. १ तरोडा अंतर्गत पथकाने धडक कारवाई करुन आणखी ४६ भूखंड जप्त केले. नोटीस प्रसिद्ध करुनही मालमत्ताधारकांनी मोकळ्या भूखंडाचे मालमत्ताकर न भरल्यामुळे ही कारवाई केल्याचे महानगरपालिकेच्या सूत्राने सांगितले. तरोड्यातील खुला गट क्र. १९७, १९८, प्लॉट क्र. २ ते ४.९ ते ११.११, १४, १५, १८, २१, २५, २६, ३७, ४२, ४३, ४७ ते ६३, ६६ ते ६९, ७३ ते ७५, ८२ व ८४ अशा ४२ भूखंडांची ९ लाख ३० हजार ५८४ रुपयाच्या थकबाकीसह कर भरणा न केल्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली.सदर कारवाई महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संभाजी वाघमारे, उपायुक्त तथा दत्तक अधिकारी संतोष कंदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव, सुनील कोटगिरे, केरबा कल्याणकर, प्रकाश गच्चे, बळीराम एंगडे व विठ्ठल तिडके आदींनी केली. क्षेत्रिय कार्यालय १ अंतर्गत यापुढेही थकबाकीदाराविरोधात जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
नांदेड मनपाने १६१ भूखंड केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:05 IST