गावकऱ्यांच्या वज्रमुठीने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही. त्याचवेळी दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेली
२५६ गावे आता कोरोनामुक्त झाली आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि गावकऱ्यांनी एकत्रित येत केलेल्या
उपाययोजनामुळे ही कोरोनामुक्ती साध्य झाली आहे.
जिल्ह्यात १३०९ ग्रामपंचायती अंतर्गत १ हजार ६०५ गावे येतात. त्यामध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटेत २७१
गावांमध्ये कोरोनाला प्रवेश मिळाला नाही. ही उल्लेखनीय बाब आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या
२५६ गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत कोरोनाला हद्दपार केले. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी
ग्रामपंचायतीची दखल थेट केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली होती. त्याचवेळी अर्धापूर तालुक्यातील अमराबाद
तांडा येथेही गावकऱ्यांनी अशीच किमया साधली. गावात ४५ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर गावकऱ्यांची
तपासणी करत रुग्णांना घरीच उपचारासाठी ठेवण्यात आले. या रुग्णांची शिक्षकांकडून देखरेख करण्यात आली
तर आशा व अंगणवाडी कार्यकर्तींनी त्यांची आरोग्याची काळजी घेतली. त्यातून हे गाव कोरोनामुक्त झाले.
गावात तरुणांच्या पथकाने गावबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली. हा नियम मोडणाऱ्यांना दंडही आकारण्यात
आला. आरोग्य विभागाला महसूल व पोलीस यंत्रणेनेही चांगली मदत केली. किनवट तालुक्यातील ५ हजार ५००
लोकसंख्येचे गाव असलेल्या इस्लापूर येथेही तब्बल २०७ रुग्ण आढळले होते. त्यानंतर गावात दोन हजारांहून
अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. घरोघरी भेटी देत कोरोना लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरणात
ठेवण्यात आले. प्रत्येक संशयितांची तपासणी करण्यात आली. गावात आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रमावर
बंदी घालण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्रित येत या उपायोजना केल्या आणि गाव कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात
सध्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात गुरुवारी एकाही कोरोना
रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गुरुवारी आढळलेल्या १३२ रुग्णांमध्ये ६२ रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत तर
१२ रुग्ण हे जिल्हा बाहेरील आहेत.
चौकट---------
लसीकरण मोहिमेला वेग
जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसअभावी या मोहिमेला गती
येत नसली तरीही आतापर्यंत ग्रामीण भागातील ३ लाख ४८ हजार ७४ नागरिकांना पहिली तर ८८ हजार ७४५
नागरिकांना दुसरी लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून आता संभावित तिसरी लाट रोखण्यासाठीही
नियोजन केले जात आहे. कोरोनामुक्तीसाठी गावकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.
-डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.
चौकट--------------
कोरोनामुक्तीत गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग
जिल्ह्यात २७१ गावे कोरोनामुक्त राहिली. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. तर त्याचवेळी हॉटस्पॉट ठरलेली
गावे कोरोनामुक्त झाली. यातही विशेष आनंद आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरला. आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य विभाग कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर आहेच. कोरोना संकट अद्याप संपले नसून सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे.
- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड.