अर्धापूर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अर्धापूर आणि मालेगाव येथे कोविड केअर सेंटर व रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री चव्हाण यांनी एका आढावा बैठकीत या दोन्ही ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करावी, अशा सूचना केल्या होत्या. याअनुषंगाने जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी मालेगाव येथील कोविड सेंटरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयास भेट दिली. सोमवारपासून हे सेंटर सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच या ट्रामा केअर सेंटरमधील सर्व सेवासुविधांचा जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला. या कोविड सेंटरसाठी डाॅक्टर व नर्सेसचा स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागणी लक्षात घेऊन हे सेंटर निर्माण केल्याबद्दल पालकमंत्री चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांचे मालेगावचे सरपंच अनिल इंगोले, उपसरपंच मोहन खंदारे, ईश्वर पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी आभार मानले.
अर्धापूरचे कोविड सेंटर चार दिवसांत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST