कंधार (नांदेड ) : पर्जन्यमान कमी व जलसाठा नसल्याने जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा दोन टप्प्याचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा ८ कोटी ८० लाख ७८ हजार संभाव्य खर्चाचा व ७२७ उपाययोजनेचा प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला होता़ परंतु प्रस्ताविकात ४ कोटी ४ लाख ४४ हजार खर्चाची व २२७ उपाययोजनाची कपात करण्यात आली आहे़ ५०० उपाययोजना व ४ कोटी ७६ लाख ३४ हजार खर्चाचा दोन टप्प्याचा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे़ त्यामुळे नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे़
मागील वर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले़ अशा लहरी पावसाने पिकाचे पोषण झाले नाही़ पीक उतारा प्रचंड घटला, जलसाठा झाला नाही़ शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ अंतिम पैसेवारीने दुष्काळी चित्र स्पष्ट झाले़ तसेच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार ही बाब समोर आली़ अशा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आ़ प्रताप पाटील चिखलीकर, पं़स़ सभापती सत्यभामा देवकांबळे, जि़प़ व पं़स़ सदस्य, प्रशासनाने पुढाकार घेवून गावनिहाय संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करून, उपाययोजना व त्यासाठीचा संभाव्य खर्चाचा प्रस्ताव तयार केला़ ७२७ उपाययोजनांवर ८ कोटी ८० लाख ७८ हजार खर्चाचा आराखडा मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला़ त्यात जवळपास खर्चात निम्मे कपात झाली़ अन् दोन टप्प्याचा आराखडा मंजूर झाला आहे़
कृती आराखडा मंजुरीची मोठी प्रतीक्षा होती़ आता ती दूर झाली आहे़ ग्रामस्थांची तत्काळ तहान भागविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे़ कार्यालयीन अधीक्षक बी़ एम़ गोटमवाड यांच्याकडे पाणीटंचाईचे प्रस्ताव स्वीकारणे ही कामे देण्यात आल्याचे समजते़ लिपिकाचे व तांत्रिक काम असल्याने मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे़ तरच पाणीटंचाई समस्या सोडविता येईल़ अन्यथा कार्यवाहीवर परिणाम होण्याची भीती आहे़
गावागावात टँकरची मागणी वाढली
जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यासाठी २८९ उपाययोजना व २ कोटी ५७ लाख ८२ हजार खर्चास मंजुरी देण्यात आली आहे़ नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी (६३) एकूण ३७ लाख ८० हजारांचा खर्च, नळ योजना विशेष १४ दुरुस्तीसाठी ४१ लाख ५० हजार, १० पुरक नळयोजनेसाठी ५६ लाख, ६५ विंधन विहीर विशेष दुरुस्तीसाठी ६ लाख ५० हजार, १०७ विहीर अधिग्रहणासाठी ३८ लाख ५२ हजार, २५ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ७५ लाख, विहीर खोल करणे / गाळ (५) साठी २ लाख ५० हजार खर्चास मंजुरी देण्यात आली आहे़ दोन महिन्याचा कालावधी संपला आहे़ डिसेंबर महिन्यापासून अधिग्रहणाचे प्रस्ताव पं़स़ कार्यालयात सादर करण्यात येत आहेत़ तसेच टँकरचीही काही गावांत मागणी आहे़
विहीर अधिग्रहण करण्यावर भर राहणार
एप्रिल ते जून २०१८ या कालावधीसाठी २११ उपाययोजना व २ कोटी १८ लाख ५२ हजारास खर्च मंजुरी आली आहे़ १५७ विहीरी अधिग्रहणासाठी ५६ लाख ५२ हजार, ५४ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ६२ लाख खर्चास मंजुरी देण्यात आली आहे़ ऐन उन्हाळ्यात विहीर व अधिग्रहण व टँकरवर पाणीटंचाई दूर करण्यावर भर राहणार आहे़