बालकाला सोडून पळून गेलेला महेश बोईनवाड याला देगलूर पाेलिसांनी बिचकुंदा येथे शोधून १७ एप्रिल रोजी त्याला अटक केली. १८ एप्रिल रोजी आरोपीला न्या.सुधीर बर्डे यांनी २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
किनवट तालुक्यात ११ लाखांची धाडसी घरफोडी
किनवट - तालुक्यातील रामजीनाईक तांडा येथे घर फोडून चोरट्यांनी सुमारे ११लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेचा तपास लावणे पोलिसांना आव्हान बनले आहे.
रामजीनाईक तांडा येथील आकाश आडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १५ एप्रिलच्या सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान चुलत बहिणीच्या लग्नासाठी परिवारासह बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि १० लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मांडवी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिवरकर करीत आहेत.
हदगावात दोन ठिकाणी दारू जप्त
हदगाव - हदगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. अधूनमधून पोलीस थातूरमातूर कारवाई करतात. नंतर परिस्थिती जैसे थे होते. दरम्यान पोलिसांनी दोन ठिकाणी अवैध दारू जप्त केली आहे.
हदगाव ते तामसा रोडवर एका व्यक्तीकडे अवैध दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे ३ हजार ४० रुपयांची विदेशी दारू व २५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा ऐवज मिळाला. चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपीने दारू बाळगली होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस शिपाई धनंजय वड्डेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली. जमादार हंबर्डे तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील आष्टी तांडा येथे एका महिलेकडून ६ हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी जप्त केली. फौजदार लहू घुगे यांनी ही कारवाई केली. हदगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार डुडुळे तपास करीत आहेत.
नांदेड-लोहा रस्त्यावर ट्रक लुटला
५५ हजार रुपये व मोबाइल लंपास
लोहा - नांदेड-लोहा रोडवरील डेरला पाटीजवळ ट्रक चालकाला अडवून चोरट्यांनी ५५ हजार रुपये रोख व दोन मोबाइल लंपास केले. सोनखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
अहमदपूर येथील वैभव शेळके यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच.२४-ए.यू.४१११) हा काही दिवसांपूर्वी बिहार आसाममध्ये गेला होता. सोबत शेळकेही होते. ट्रकचालक किशन बाचोटे आणि क्लीनर दीपक वाघमारे होते. १६एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील कटनी येथून सिमेंटचे पोते भरून १८ एप्रिलच्या पहाटे ते नांदेडला पोहचले. यादगीर येथे जाण्याअगोदर घरी जाऊन यावे, असा त्यांचा बेत होता. रविवारी पहाटे डेरला पाटीजवळ असताना मोटारसायकलवर आलेल्या चार दरोडेखोरांनी ट्रक समोर दुचाकी उभ्या करून ट्रक रोखण्यास भाग पाडले. यातील एकाने ट्रकच्या काचा फोडल्या. लोखंडी रॉडचा धाक दाखवत शेळके यांना धमकी दिली. यावेळी शेळके यांनी खिशातील ५ हजार रुपये काढून दिल्यानंतर दरोडेखोर निघाले. पुन्हा ते परत आले आणि ट्रकच्या वाहतूक भाड्यापोटीचे ५० हजार रुपये सीट खाली ठेवले होते, ते घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. सोबत मोबाइलही नेले.
सोनखेड पोलिसात वैभव शेळके यांनी या घटनेची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.