नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) यांच्या पदोन्नतीचा मार्ग अजूनही शासन दरबारी रखडलेलाच आहे. यातील काही कनिष्ठ अभियंता यांची २५ वर्षांची सेवा पूर्ण झाली. तर काही कनिष्ठ अभियंता पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्तही झाले. परंतु त्यांचे प्रमोशन काही झाले नाही. विशेष म्हणजे, पदोन्नतीच्या ३५० जागा शिल्लक असतानाही शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पदोन्नतीचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही.
बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता हा महत्त्वाचा कणा आहे. मात्र, यांच्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी शासनावर रोष व्यक्त केला आहे. स्थापत्य (सिव्हिल), इलेक्ट्रिकल व मेकॅनिक विभागांत काम करणाऱ्या अभियंत्यांचा यामध्ये समावेश आहे. शासनाने सरळ सेवा भरती प्रक्रियेत ५० उपविभागीय अभियंत्यांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा देऊनही कनिष्ठ अभियंत्यांकडे मात्र शासनाचे लक्ष गेले नाही.
या पदासाठी वेळोवेळी पदभरती करण्यात येते. जेव्हा की पदविकाधारक कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया शासनस्तरावरून काही अधिकारी हे कनिष्ठ अभियंता संवर्गाला कमी लेखत असल्याने मुद्दामहून रखडवल्या जात आहेत, असा आरोप अभियंत्यांनी केला आहे.
बांधकाम मंत्र्यांनी दिले आश्वासनपदोन्नतीसंदर्भात कनिष्ठ अभियंत्यांनी बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावर इंद्रनील नाईक यांनी अभियंत्यांना आश्वासन देऊन पुढील १५ दिवसांत सचिवांसोबत बैठक घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे अभियंत्यांना सांगितले. लवकरच हा मुद्दा निकाली काढून कनिष्ठ अभियंत्यांचा पदोन्नतीचा मार्ग सुकर होईल, असे आश्वासन नाईक यांनी अभियंत्यांना दिले.
शासन उदासीन का?स्वाभाविकच प्रमोशन कुणाला पाहिजे नसते. २५ वर्षे सेवा देऊनही प्रमोशन होत नसेल तर चिडचिड होईलच. विशेष म्हणजे, ३५० जागा भरावयाच्या असतानादेखील शासनाकडून कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती दिली जात नाही. कनिष्ठ अभियंत्यांच्या बाबतीत शासन कमालीची उदासीन असल्याचा आरोप या अभियंत्यांनी केला आहे.