जालना : पोटच्या मुलीला मारहाण करून लिंबाच्या झाडाला फाशी देऊन खून करणाऱ्या बाप आणि चुलत्याला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी शुक्रवारी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा व कलम २०१ भादंविमध्ये दोन्ही आरोपितांना ३ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पीरपिंपळगाव शिवारातील भातखेडा येथील गट नंबर ११ मधील शेतवस्तीवर संतोष भाऊराव सरोदे हा आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याची १७ वर्षीय मुलगी गावातीलच एका मुलासोबत घरातून निघून गेली होती. या प्रकारामुळे सरोदे कुटुंबीयांचा समाजात अपमान झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. काही दिवसांनी मुलगी आणि तो मुलगा परत आल्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्याचे ठरले. गारखेडा येथील मंदिरात लग्नाची तयारी सुरू असताना, आरोपींनी मुलाच्या नातेवाइकांकडे मुलीच्या नावावर दीड एकर जमीन करून देण्याची मागणी केली. यावरून दोन्ही पक्षांत मोठा वाद झाला आणि लग्न फिसकटले.
फाशीनंतर शेतातच मृतदेह जाळला संतापलेले वडील संतोष सरोदे आणि चुलता नामदेव सरोदे यांनी मुलीला दुचाकीवर बसवून घरी आणले. तिथे तिला मारहाण करून कडुलिंबाच्या झाडाला फाशी देऊन तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी कोणालाही न सांगता परस्पर शेतातच तिचा अंत्यविधी उरकला. दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी पोलिस उपनिरीक्षक झलवार आणि पोहेकॉ तागवाले गस्त घालत असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, तिथे जळालेली जागा, राख आणि काही हाडे आढळून आली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
...यांच्या साक्ष ठरल्या महत्त्वाच्यासरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये त्यात फिर्यादी पोहेकॉ तागवाले, घटनास्थळ पंच, मयताचा प्रेमी, मंदिरापासून मुलीला घेऊन जाताना मोबाइल चित्रीकरण करणारे साक्षीदार, राजेंद्र बनसोडे, मंदिरात व शेवटचे मयत मुलीस शेतवस्तीत आरोपीच्या घरासमोर पाहणारे राजेंद्र कोल्हे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
ही ठोठावली शिक्षाअतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशांक ढोकरट यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड. कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) : ३ वर्षे कारावास आणि ५,००० रुपये दंड. या प्रकरणाचा यशस्वी तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी केला.
...यांची मिळाली मोलाची मदतपोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलिस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, सेशन कोर्ट पैरवी, पोलिस अंमलदार व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मोलाची मदत मिळाली.
Web Summary : In Jalna, a father and uncle received life sentences for murdering a daughter who eloped. They killed her and burned the body to destroy evidence after her failed marriage attempt. The court convicted them based on key witness testimonies and evidence presented by the prosecution.
Web Summary : जालना में, एक पिता और चाचा को भाग जाने वाली बेटी की हत्या के लिए आजीवन कारावास की सजा मिली। विफल विवाह प्रयास के बाद उन्होंने उसकी हत्या कर दी और सबूत नष्ट करने के लिए शव को जला दिया। अदालत ने अभियोजन द्वारा प्रस्तुत प्रमुख गवाहों और सबूतों के आधार पर उन्हें दोषी ठहराया।