राजीव गांधी यांना आदरांजली
अर्धापूर : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम काँग्रेसच्या वतीने २१ मे रोजी घेण्यात आला. यावेळी सरचिटणीस संजय देशमुख, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील, शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे, संचालक प्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष डॉ. विशाल लंगडे, नगरसेवक खतीब, व्यंकटराव साखरे, सोनाजी सरोदे, आदी उपस्थित होते.
आरोपींना जामीन मंजूर
हदगाव : येवली, ता. हदगाव येथील सुभाष खिल्लारे आत्महत्या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यातील पाचजणांना नांदेड जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. तामसा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शेतजमिनीच्या कारणावरून ही घटना घडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कृषी केंद्र संचालकांची बैठक
धर्माबाद : तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, विश्वास अर्धापुरे यांनी घेतली. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मारोती कांगुरे, तर प्रमुख पाहुणे उपसभापती चंद्रकांत वाघमारे होते. यावेळी पवार व अर्धापुरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी मुभा असल्याने शेतकऱ्यांची गर्दी दुकानावर होणार नाही, सुरक्षित अंतर नियमाचे पालन करा, असे यावेळी सांगण्यात आले.
रुग्णांची हेळसांड
किनवट : तालुक्यातील कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नाही, असा आरोप आहे. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मास्कचे मोफत वाटप
नांदेड : बहुजन नायक काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिडको नांदेडच्या वतीने गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्ताने मोफत मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ॲड. नितीन सोनकांबळे, बामसेफचे एम. डी. कोल्हे उपस्थित राहणार आहेत. २६ मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी दिली. यावेळी बी. एस. गोडबोले, सुभाष लोखंडे, अशोक गवळे, गोविंद कोंके, ज्योतिबा भोळे, रोहिदास गोमसकर, जय पंडित, राजरत्न सदावर्ते उपस्थित होते.
सिडकोत आरटीपीसीआर चाचणी
नांदेड : मनपाच्या सिडको मातृसेवा आरोग्य केंद्रांतर्गत फिरत्या पथकाद्वारे सिडको परिसरातील मुख्य बाजारपेठ व फळ विक्रेत्यांची २३ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ मोहिनी वाघमारे, एकता सोनकांबळे, संदीप तुपेकर, ओम पचलिंग, अर्जुन चिंतेवार, आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी
मुखेड : ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी, तर शहराध्यक्षपदी इम्रान पठाण यांची निवड झाली. २३ मे रोजी बल्खीनगर येथे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
गाळमुक्त अभियानाचा प्रारंभ
देगलूर : तालुक्यातील शिळवणी येथे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व शासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी तहसीलदार विनोद गंडमवार, गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, सरपंच मनोहरराव देशमुख, उपसरपंच देवकत्ते, विस्तार अधिकारी कानडे, संस्कृती संवर्धन मंडळाचे रावणगावकर उपस्थित होते.