माहूर पोलिसांचा छापा
माहूर- तालुक्यातील इवळेश्वर येथील नाल्याजवळ गावठी दारू विक्री करणाऱ्या अड्डयावर माहूर पोलिसांनी छापा टाकून ७ हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी उद्वव गंभीरा राठोड याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्याच्या ताब्यातील ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज व ८३० रुपये नगदी जप्त करण्यात आले. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनुदान देण्याची मागणी
बिलोली- लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, मजूर, कष्टकऱ्यांना जगणे कठीण झाल्याने त्यांना आर्थिक अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तीन महिन्यांचे वीज बील माफ करावे, भाडे व हप्तेफेडीसाठी सवलत द्यावी, आदी मागण्या विजयालक्ष्मी पाळे, राजू पाटील, शंकर मावलगे, आशा पांचाळ, बोधनेताई, जयश्री पांचाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अन्नधान्य कीटचे वाटप
लोहा- स्वयंशिक्षण प्रयोग व कमलउदवाडीया फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील दहा गावांतील २०० गरजू कुटुंबांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या संचालिका प्रेमा गोपालन, कार्यक्रम व्यवस्थापक राजाभाऊ जाधव, तालुका समन्वयक रेवती कानगुले व दहा गावांतील आरोग्य सखींनी हा कार्यक्रम पार पाडला.
दहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर
किनवट- कोविड निवारण्यासाठी किनवटमध्ये १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध झाले. त्यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. या अगोदरच हे साहित्य उपलब्ध होण्याची गरज होती, अशी चर्चा रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
कामांना मिळाली गती
मुदखेड- रस्ते विकास योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील ४४ योजनेबाह्य रस्त्यांना समाविष्ट करण्यास सार्वजिनक बांधकाम विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे कामांना गती मिळाली आहे.