मेघगर्जनेसह पाऊस
कामठा बु. : अर्धापूर तालुक्यातील कामठा बु., गणपूर परिसरात १४ एप्रिल रोजी रात्री मेघगर्जनेसह वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. आंब्यालाही फटका बसला.
अभाविपच्या वतीने भीमजयंती
नांदेड : अभाविपच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन भीमजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच विद्यापीठ शाखेच्या वतीने भीमगीत संध्या हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात आला. यामध्ये सुशील खिल्लारे यांनी भीमगीते सादर केली. तसेच महानगराच्या वतीने इन्स्टाग्रॅम प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. भोकर शाखेच्या वतीने काव्यलेखन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
हिवताप कार्यालयात जयंती
नांदेड : येथील जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेची पुष्पपूजा करून अभिवादन करण्यात आले.
जानापुरी येथे अभिवादन
जानापुरी : येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा गावातील प्रमुख मंडळी व महिलांनी केली. त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी प्रशिक नवयुवक मंडळाने परिश्रम घेतले.
आरोग्य केंद्राला भेट
कुंटूर : कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राला आ. राजेश पवार यांनी भेट देऊन विविध उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ सोनवणे, ग्रा.पं. सदस्य सूर्यकांत कदम, पंडित पाटील, पार्वती कदम, नागोराव भोसले, राम अडकिणे, आदी उपस्थित होते.
कुलकर्णी यांना श्रद्धांजली
माहूर : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. श. कुलकर्णी यांना माहूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सरफराज दोसानी, अधिकारी विशालसिंह चौहाण, एस. एस. पाटील, मिलिंद कंधारे, राजू ठाकूर, नीतेश बनसोडे, गजानन कुलकर्णी, ज्ञानेश्वर पवार, आदी उपस्थित होते.
शेतकरी मशागतीत व्यस्त
हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी शेती मशागतीत व्यस्त आहेत. अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असले, तरी कष्टकरी शेतकरी कशाचीही पर्वा न करता मशागतीच्या कामात व्यस्त दिसत आहेत. काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीवरच काम भागवत आहेत.
शिवणी परिसरात पाऊस
शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी येथे मंगळवारी दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. शेतकरी वर्ग गुढी उभारून शेतात काम करून घरी आले व नवीन सालगड्याबाबत चर्चा करीत आहेत. वातावरणातही बदल नव्हता. अचानक वादळी वारे व पावसाने हजेरी लावली. या भागात मका, ज्वारीसह तिळाचे पीक घेतले जाते.
फुले यांना अभिवादन
लोहा : तालुक्यातील कापसी बु. येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच ललिता आळणे, दत्तराम वडवळे, शंकरराव वडवळे, नागेश पाटील, केशव वडवळे, शिवाजी आळणे, श्रीकांत वडवळे, सुभाष कांबळे, आदी उपस्थित होते.
आगीत घर जळाले
बिलोली : तालुक्यातील थडीसावळी येथील बालाजी बोंगुलवार यांच्या राहत्या घराला ११ एप्रिल रोजी रात्री शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत घरातील १५ क्विंटल ज्वारी, हरभरा, करडई तसेच अन्य चीज वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलाठी शेख सलीम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यात दोन लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले.
वीजपुरवठा वारंवार खंडित
नायगाव : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. छोटेमोठे उद्योग, व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते, असा आरोप ग्राहकांचा आहे.