शेलार हे गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील अनलॉक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. राज्यात प्रतिबंध असतानाही कोरोनाचा प्रसार थांबवता आला नाही. सरकारचे हे अपयशच आहे. लोकप्रियतेच्या खोट्या सर्व्हेच्या आधारावर सरकार अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. राज्याचे ओबीसीचे निवडणुकीतील आरक्षण टिकविण्यात सरकारला अपयश आल्याचे सांगत, फडणवीस सरकारच्या काळात काढण्यात आलेला जीआर पुढे कायम करण्याचे कामही हे सरकार करू शकले नाही. सर्वेोच्च न्यायालयात १५ महिन्यात सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आठ वेळा तारीख वाढवून घेतली. सरकार भूमिका मांडू शकले नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण काढून घेण्यात आले. मराठा आरक्षणाबाबतही सरकारने योग्य ती पावले उचलली नसल्यानेच आरक्षण टिकले नाही. असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजेंच्या अल्टिमेटमबाबत शेलार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच भाजपची भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण साले, प्रणिता चिखलीकर, संतुक हंबर्डे आदी उपस्थित होते.
राज्यात अनलॉकचे टप्पे पाच की पंधरा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST