वाहतूक शाखा, महामार्ग पाेलिसांमार्फत नियम माेडणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई केली जाते. सायलेन्सरचा अधिक आवाज, फॅन्सी नंबर प्लेट यांसह इतरही प्रकरणात दंडात्मक कारवाई केली जाते. शहरात तर रस्त्याच्या थाेडेही पुढे असलेले वाहन सर्रास टाेईंग करून जमा केले जाते. याच नियमाने पाेलिसांवर कारवाई काेण करणार, असा मुद्दा पुढे आला आहे. वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या आपल्याच पाेलिसांवर कारवाईसाठी लातूरचे जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पुढाकार घेतला आहे. १४ सप्टेंबर राेजी त्यांनी आपल्या अधिनस्थ सर्व कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई, असे आदेशच जारी केले. लातूरप्रमाणेच नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यातील पाेलीस अधीक्षक आपल्या अधिनस्थांवर कारवाईसाठी पुढाकार घेतात का, याकडे लक्ष लागले आहे. आजही नांदेडसह इतर जिल्ह्यांत पाेलिसांच्या खासगी वाहनांचा, विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज माेठा करण्याचे प्रकार सुरू आहेत. पाेलीस पुत्रांबाबत हा प्रकार आहे. याशिवाय पाेलिसांच्या खासगी दुचाकीला फॅन्सी नंबरप्लेट बसवून ती सर्रास वापरली जाते. नियमांची अंमलबजावणी करणारेच नियम माेडत असल्याचे चित्र यातून पुढे आले आहे.
पाेलिसांच्याच खासगी वाहनांना ‘फॅन्सी नंबरप्लेट’; जनतेवर कारवाई, पाेलिसांवर केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST